वर्गणी तमाशाची…काम होणार पाझर तलावांच्या खोलीकरणाचे ; दहीवद गावकऱ्यांचे कौतूक

c61afb1e 3b4c 40a1 8e02 0e84c296f3ea

 

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील दहीवद येथील गावालगत असलेल्या तिघं पाझर तलावात मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने भर पावसाळ्यात दरवर्षी भरणाऱ्या पाझर तलावात क्षमतेपेक्षा कमी पाणीसाठा साचत होते. गावालगत तीन पाझर तलाव असून देखील भर उन्हाळ्यात चार-पाच दिवसात गावाला पाणीपुरवठा होत असल्याने ही संभाव्य पाणीटंचाई भविष्यात कायमची दूर व्हावी, यासाठी आज दहीवद ग्रामस्थांनी तमाशासाठी जमवलेली वर्गणी व गावातील लोकसहभाग यातून या तिघं पाझर तलावांचा गाळ उपसण्याचा निर्णय घेतला. यासाठी उद्योजक युवा नेते मंगेश दादा चव्हाण यांनी मोफत विना मोबदला पोकलेन मशीन उपलब्ध करून दिल्याने लवकरच या तलावातील पाणी क्षमता वाढणार आहे.

 

या तिघं पाझर तलावांचा गाळ उपसण्यामुळे भविष्यात दहिवद गावाला दररोज पाणीपुरवठा होणार आहे. दरम्यान, गावकऱ्यांनी तमाशासाठी जमा केलेली रुपये एक लाख ४० हजार रुपये लोकवर्गणी विधायक कामासाठी उपयोगात आणल्याने दहिवद ग्रामस्थांचे तालुक्यात व जिल्ह्यात अभिनंदन होत आहे. दहिवद गावाची लोकसंख्या आठ हजार आहे. सधन शेतकरी गावकऱ्यांचे गाव म्हणून चाळीसगाव तालुक्यात दहिवद गावाचा वेगळा राजकीय सामाजिक शैक्षणिक दबदबा आहे. या गावाला लागून तीन मोठे तलाव आहेत. हे पाझर तलाव दरवर्षी पावसाळयात भरतात. मात्र, यामध्ये तलाव निर्मितीपासून गाळ काढण्यात आलेला नाही. त्यामुळे या तलावांमध्ये पाणी साठवण्यासाठी खोली शिल्लक राहिलेली नाही, ही बाब सरपंच सुरेखा पवार,माजी सरपंच भिमराव पवार उपसरपंच भीमराव खलाणे व सहकारी यांच्या लक्षात आली. त्यांनी याबाबत गावकर्‍यांशी चर्चा करून या तिघं तलावांच्या खोली करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. यासाठी सर्वांच्या लोकसहभागाची गरज आहे, असा प्रस्ताव मांडला. याप्रसंगी तालुक्यात ज्या ठिकाणी पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अशा प्रसंगी उद्योजक मंगेश चव्हाण हे आर्थिक मदत करत असल्याची बाब समोर आली. त्यामुळे मंगेश चव्हाण यांच्याकडे लागलीच तिघंही पाझर तलाव खोलीकरण करण्याचा प्रस्ताव ठेवला. मंगेश चव्हाण यांनी देखील तात्काळ प्रतिसाद देत पोकलेन उपलब्ध केले. हे पोकलेन तलावातील खोलीकरण पूर्ण होईपर्यंत उपलब्ध करून दिले जाणार आहे. गावकऱ्यांनी या पोकलेनसाठी डिझेलचा खर्च करावा, तरीही काही कमी अधिक आर्थिक मदत लागली तर मी करण्यास तयार आहे,असे आश्वासन श्री.चव्हाण यांनी दिले आहे. पाणी टंचाई दूर होण्यासाठी आपण घेतलेला निर्णय इतर ग्रामपंचायतींनी अनुकरणीय असल्याचे मत देखील त्यांनी व्यक्त केले.

 

गावाने जमा केलेली तमाशा वर्गणी डिझेल खर्चासाठी

दरवर्षी ग्रामीण भागामध्ये यात्रा प्रसंगी तमाशाचा कार्यक्रम आयोजित केला जातो, ही परंपरा आहे. यासाठी गावात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वर्गणी जमा केली जाते. अशाच प्रकारे दहीवद गावात देखील एक लाख 40 हजार रुपये वर्गणी जमा झाली होती. आज या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी माजी सरपंच भिमराव पवार व सरपंच सौ.पवार यांनीही वर्गणी डिझेल करण्यासाठी वापरावी अशी सूचना मांडली. त्यावर उपस्थित सर्व गावकऱ्यांनी एकमताने या सूचनेला पाठिंबा दिला. जळगाव जिल्ह्यात अशा पद्धतीची तमाशा वर्गणी विधायक कामासाठी खर्च करणारे दहीवद हे एकमेव गाव ठरले आहे. यावेळी माजी सरपंच भीमराव पवार यांनी स्वतःचे १० हजार रुपये,शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख तथा उपसरपंच भीमराव खलाणे यांनी ५ हजार, बळवंत वाघ यांनी ५ हजार अशा पद्धतीने अनेक दहीवदगावकरी यांनी लोकसहभागातून मदत करण्याची जाहीर केले.

 

मंगेश चव्हाण यांचे कौतुक 

दहिवद गावातील तलाव खोलीकरण यासाठी उद्योजक मंगेश चव्हाण यांनी पोकलेन उपलब्ध करून दिले आहे. गावाने पाणी टंचाई दूर करण्यासाठी या पोकलेनच्या माध्यमातून आपल्याला हवे असलेले पाझर तलावातील खोलीकरणाचे काम पूर्ण करावे, अशी आपल्या मनोगतात सांगितले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य सुधाकर वाघ यांनी देखील तरुण उद्योजक मंगेश चव्हाण यांच्या दातृत्वाचे कौतुक केले. गेल्या तीस चाळीस वर्षांपासून मी राजकारणात आहे. मात्र, अशा पद्धतीची आर्थिक मदत व विधायक चळवळ तरुण कार्यकर्ते मंगेश चव्हाण पुढे नेत असल्याने त्यांना उज्वल भविष्यासाठी आशीर्वाद दिले.

आज सकाळी दहा वाजता या नाला खोलीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सरपंच सुरेखा भिमराव पवार ,माजी सरपंच भिमराव पवार, शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख उपसरपंच भीमराव खलाणे, माजी पंचायत समिती सदस्य सुधाकर वाघ, भीमराव पवार, बळवंत वाघ,चींधा वाघ ,एकनाथ पवार, एकनाथ खालाणे,नितीन बागुल, तानाजी जाधव, अनमोल नानकर, उत्तम कोळी, मुरलीधर वाघ, रतन पाटील, गोरख पवार,अनिल सोनवणे, हेमराजपाटील, पिंगळे सुदाम घोडे, बाबाजी मोरे शिवाजी शितोळे ,राजेंद्र पवार यांच्यासह दहीवद गावातील व पंचक्रोशीतील शेकडो तरुण ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून नाला खोलीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. गावकऱ्यांनी प्रचंड आनंदात टाळ्या वाजवून या उपक्रमात सहभाग नोंदवला.

Add Comment

Protected Content