Home Cities अमळनेर चुरा मिश्रित खडीने शहापूर रस्त्याच्या कामाला सुरुवात ; दर्जाबाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी

चुरा मिश्रित खडीने शहापूर रस्त्याच्या कामाला सुरुवात ; दर्जाबाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या अमळनेर तालुक्यातील कळमसरे–शहापूर रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली असली तरी या कामाच्या गुणवत्तेबाबत सुरुवातीलाच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. रस्त्याच्या कामात वापरण्यात येणाऱ्या साहित्यावरून कळमसरे आणि शहापूर येथील ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, काम खरोखरच दर्जेदार होणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

प्राथमिक टप्प्यात रस्त्याच्या दुतर्फा कोरलेल्या साईड पट्ट्यामध्ये टाकण्यात आलेली खडी पूर्णतः चुरा मिश्रित असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. नियमांनुसार दर्जेदार खडीचा वापर अपेक्षित असताना चुरा मिश्रित साहित्य टाकण्यात येत असल्याने रस्त्याची मजबुती आणि आयुष्याबाबत शंका निर्माण झाली आहे. सुरुवातीपासूनच निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्यास भविष्यात रस्ता पुन्हा लवकर खराब होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

याशिवाय कळमसरे ते शहापूर दरम्यानच्या मार्गावर पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांवर करण्यात येणाऱ्या कामाबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. या रस्त्यावर तब्बल सात ते आठ ठिकाणी लहान फरशी पूल उभारण्यात येत असून, प्रत्यक्षात काही ठिकाणी मोठ्या आणि मजबूत फरशी पुलांची गरज असताना तात्पुरत्या स्वरूपाचे काम केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. काही नाल्यांच्या ठिकाणी तर जैसे थे स्थिती ठेवण्यात येणार असल्याची चर्चा सुरू असल्याने पावसाळ्यात वाहतुकीचा मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या रस्त्यावरून दररोज शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार आणि ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणावर प्रवास करतात. त्यामुळे रस्त्याचे काम मजबूत, टिकाऊ आणि दर्जेदार होणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र सध्याच्या कामपद्धतीमुळे शासनाच्या निधीचा योग्य वापर होतो आहे का, असा सवालही ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

ग्रामस्थांनी संबंधित बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधींनी या कामाची तातडीने पाहणी करून वापरण्यात येणाऱ्या साहित्याची गुणवत्ता तपासावी, तसेच गरज असलेल्या ठिकाणी मोठ्या फरशी पुलांची उभारणी करावी, अशी मागणी केली आहे. वेळेत योग्य सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे.


Protected Content

Play sound