जळगाव प्रतिनिधी| निवडणुकांच्या स्पर्धांमध्ये पक्षाला यश अपयश येणे स्वाभाविक आहे. मात्र ही सहामाही परीक्षा समजून विसरून जा आणि वार्षिक परीक्षा आहे, असे समजून जोराने कामाला लागा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी केले. आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.
‘लक्ष विधानसभा’ असे घोषवाक्य घेऊन आज जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांच्या अध्यक्षतेखाली आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ, रिताताई बाविस्कर, महिला जिल्हाध्यक्षा कल्पनाताई पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील, विलास पाटील, शहराध्यक्ष नामदेवराव चौधरी, विजया पाटील, प्रमिला पाटील यांच्यासह शहर व ग्रामीण भागातील महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील बोलताना सांगितले की, स्थानिक पातळीवर महिला कार्यकर्त्यांनी नवमतदारांना नोंदणीचे आवाहन करून भावी उमेदवाराला विजय मिळवून देण्याचा संकल्प करून द्यावा. तसेच येत्या दोन दिवसात कामांचे नियोजन करून येणारे विधानसभा आपले राहील या पद्धतीने कामाला लागा असे आवाहन यावेळी केली.