रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या सीमेवरून लाकडांची तस्करी करण्याचा डाव वन विभागाने उधळला असून लाकडांची चोरटी वाहतूक करणारा ट्रक जप्त केला आहे.
महाराष्ट्र-मध्यप्रदेश सिमेवर लाकडांची तस्करी थांबता-थांबेनासी झाली आहे. वनविभागाने विनापरवाना लाकडांनी भरलेले ट्रक मध्य प्रदेशच्या दिशेने जातांना चोरवड नजिक पकडलेला आहे.यामुळे एकच खळबळ उडाली आहे.येथे चेकपोस्टवर वनविभागाचे नाकेदार येथून आर्थिक सेटलमेंट करून लाकडांनी भरलेल्या ट्रकांकडे दुर्लक्ष करत असल्याची नागरीकांमध्ये ओरड आहे.
वन खात्याला मिळालेल्या गुप्त माहीती वरुन मध्य प्रदेश-महाराष्ट्रा सिमेवर दि ६ जून रोजी पहाटे अडीच वाजता वनपरिक्षेत्र रावेर मधील तपासणी नाका चोरवड येथे संशयित ट्रक क्र. एमएच १८ बीजी ८१६७ ला थांबवुन चौकशी केली असता त्यात विना परवाना दोन हजार घ मी पंच रास जळावू लाकूड मिळून आले. याची लगेच वनविभागाने दखल घेत पाच लाख रुपये किमतीचा ट्रक व १७ हजार ८० रुपयाचे पंचरास जळाऊ लाकूड असे एकूण पाच लाख १७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईमध्ये संशयित आरोपी- शे. तनवीर शे. निसार (वय ३२ रा. चोपडा ) याच्या विरुद्ध भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१(२) ब, ४२,५२ नुसार वन गुन्हा नोंद केला.पुढील तपास वनपाल अहिरवाडी करत आहे.
सदर कार्यवाही उपवनसंरक्षक यावल जमीर शेख,सहाय्यक वनसंरक्षक यावल प्रथमेश हाडपे तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर यांच्या मार्गदर्शनाखाली र.अ.भुतेकर वनरक्षक तपासणी नाका चोरवड, गोविंदा मराठे अधि. वनमजूर, राजू तडवी वनमजूर यांनी केली.