धानोरा , ता.चोपडा (प्रतिनिधी) घरगुती नळांना पाणी येत नाही म्हणुन सार्वजनिक पाण्याचे नळ बसवावे, या मागणीसाठी गावातील सुमारे ५० महिला आज (दि.३०) सायंकाळी ५.३० च्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. दोन दिवसात गावात पाण्याचे सार्वजनिक नळ लागले नाहीत तर ग्रामपंचायत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
आजच्या ठिय्या आंदोलनाची दखल महिला सरपंच किर्ती पाटील व आठ महिला ग्रामपंचायत सदस्यांपैकी एकीनेही न घेतल्याने महिला अधिकच संतापल्या. गावातील शिवगल्ली व माळीवाड्यातील पाण्याच्या या समस्येबाबत सरपंच पती किरण पाटील यांनाही ग्रामस्थांनी वारंवार फोन केले मात्र त्यांनीही दखल घेतली नाही, असा आरोपही यावेळी महिलांनी केला. आजच्या आंदोलनात नलिनी चौधरी, जनाबाई चौधरी, विमल चौधरी, वंदना चौधरी, शोभा चौधरी, सरला माळी, सुरेखा चौधरी, कमल माळी, सुमन माळी, कल्पना माळी, छाया माळी, जिजा माळी, धृपदा चौधरी, निर्मला चौधरी यांच्यासह अनेक महिला सहभागी झाल्या होत्या.