Home धर्म-समाज पिंपरखेड मारुती येथे पर्यावरण रक्षणासाठी महिलांचा पुढाकार 

पिंपरखेड मारुती येथे पर्यावरण रक्षणासाठी महिलांचा पुढाकार 


पारोळा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  तालुक्यातील पिंपरखेड मारुती येथे लाडशाखीय वाणी समाजाच्या संस्कृती महिला मंडळातर्फे दिनांक २६ जुलै २०२५ रोजी वृक्षारोपणाचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने महिलांनी घेतलेली ही पाऊले एक प्रेरणादायी उदाहरण ठरली.

या कार्यक्रमाचे नियोजन महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. वर्षा पूरकर, सौ. दिपिका शेंडे आणि सौ. वर्षा कोठावदे यांनी केले होते. पारोळा जवळील पिंपरखेड मारुती मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमात विविध प्रजातींच्या झाडांची लागवड करण्यात आली. महिलांनी उत्साहाने सहभाग घेत पर्यावरण रक्षणाचा वसा घेतला.

कार्यक्रमात सौ. निता नावरकर यांनी ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या संत तुकारामांच्या अभंगाचा संदर्भ देत वृक्षारोपणाचे आणि पर्यावरण संतुलनाचे महत्त्व विशद केले. त्यांनी सांगितले की, वृक्ष हे केवळ सौंदर्यवृद्धीसाठी नाहीत, तर ते पर्यावरण रक्षणाचे अत्यंत महत्त्वाचे साधन आहेत.

सौ. शीतल टिपरे व सौ. योगिता येवले यांनी उपस्थित महिलांना दरवर्षी वृक्षारोपण करण्याचा व लावलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याचा संकल्प दिला. सर्व महिलांनी एकमुखाने सहमती दर्शवत वृक्षसंवर्धनाची जबाबदारी शासनासोबतच आपलीही आहे, हे अधोरेखित केले.

महिला मंडळाच्या या उपक्रमामुळे सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक दृढ झाली असून ग्रामस्तरीय पर्यावरण रक्षणासाठी नागरिकांचे योगदान किती महत्त्वाचे आहे, हे सिद्ध झाले. अशा उपक्रमामुळे ग्रामीण भागात पर्यावरण जागृती वाढत असून महिलांची भूमिका यामध्ये निर्णायक ठरत आहे.

कार्यक्रमाची सांगता पर्यावरण रक्षणासाठी सातत्याने कार्यरत राहण्याच्या निर्धाराने करण्यात आली.


Protected Content

Play sound