जळगाव, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार, दि. २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली ‘महिला लोकशाही दिना’चे ऑनलाईन आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास डॉ.वनिता सोनगत यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.
जिल्ह्यातील समस्याग्रस्त व पीडीत महिलांना प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा, शासकीय यंत्रणांकडून सोडवणुकीसाठी समाजातील पीडित महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध होवून प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिन जिल्हास्तरावर दर महिन्याचा तिसऱ्या सोमवारी व तालुकास्तरावर प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी हा उपक्रम राबविण्यात येतो.
त्यानुसार सोमवार,दि. २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता ‘महिला लोकशाही दिन’ जिल्हाधिकारी कार्यालयात ऑनलाइन आयोजीत करण्यात आलेला आहे. या लोकशाही दिनी ज्या महिलांना अर्ज करायचा असेल त्यांनी आपला अर्ज आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या ई- मेलवर पाठवावा. तसेच अर्जामध्ये आपला व्हॉटसॲप क्रमांक नमूद करावा, जेणेकरुन या लोकशाही दिनाची लिंक व पासवर्ड अर्जदारास उपलब्ध करुन देणे शक्य होणार आहे, असे जिल्हा महिला व बालविकास डॉ. वनिता सोनगत यांनी गुरूवारी १७ फेब्रुवारी रोजी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.