पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील सांगवी येथे दारूबंदीसाठी महिलांनी अतिशय आक्रमक भूमिका घेऊन पोलीस स्थानकावर मोर्चा काढला.
सांगवी येथे दारूचा मुद्दा संवेदनशील बनला आहे. येथे दारूबंदीयाबाबत गावात महिला ग्रामसभा घेऊन या ग्रामसभेत ग्रामपंचायतीचा ठराव करण्यात आला आहे. गावातील महिला सविताबाई जब्बरसिंग पाटील यांनी या सभेत सांगितले की, गावात अवैध दारू विक्री होत असून त्यामुळे तरुण पिढीला वाईट वळण लागले आहे. या विषारी दारूमुळे अनेक तरुणांनी आपले जीव गमावले असून अनेक मृत्यूच्या दाढेत आहेत. मात्र असे असूनही दारूबंदी न करण्यात आल्याने अनेक कुटुंबे उदध्वस्त होत आहेत. परिणामी गावात कायमस्वरूपी दारूबंदी करण्यात यावी अशी मागणी महिलांनी केली. याबाबतचे निवेदन पारोळा पोलिस ठाण्यात निरीक्षक सचिन सानप यांना देण्यात आले. याप्रसंगी छायाबाई गोरख पाटील, उषाबाई रामदास पाटील, मालुबाई दिलीप पाटील आदी उपस्थित होते.