जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महिलांची कामगिरी नेहमी श्रेष्ठच राहिली आहे. महिलांनी पुढे येऊन जबाबदाऱ्या स्वीकारल्या पाहिजे. बोला, पुढे या, व्यक्त व्हा, स्वतःला सिद्ध करा. निश्चितच धाडस प्राप्त करून यश व हिंमत तुम्हाला मिळेल असे प्रतिपादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव च्या वतीने विविध विभागात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान आणि विशेष व्याख्यानांचे मंगळवारी ८ मार्च रोजी दुपारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उप अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले, प्रशासकीय अधिकारी डॉ. जितेंद्र सुरवाडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगिता बावस्कर, परिचारिका महाविद्यालयाचे प्राचार्य अनिता भालेराव उपस्थित होते.
सुरुवातीला प्रस्तावनामधून जागतिक महिला दिनाविषयी माहिती व कार्यक्रमाविषयी डॉ. मोनिका युनाती यांनी माहिती सांगितली. यानंतर डॉ. सोनाली मुपाडे यांनी “महिलांचे आरोग्य – नेमके चुकतेय कुठे” याविषयी मार्गदर्शन करताना सांगितले की, महिला नोकरी, कुटुंब या संकल्पनेत जीवन जगत असताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. वेळोवेळी महिलांनी नियमित तपासणी करून घेतली पाहिजे.
“तणाव व्यवस्थापन” विषयी डॉ. योगिता बावसकर यांनी सांगितले की, रुग्णालय व महाविद्यालयात काम करीत असताना कामाचा ताण घेऊ नका. कामाचे व्यवस्थापन सुरळीत केल्यास काम वेळेवर पार पडतात. महिलांनी काम करताना किंवा जीवन जगताना नकारात्मक भावना नष्ट केल्या पाहिजेत. स्त्रिया स्वत: सुखी राहिल्या तर इतरांना देखील त्या सुखी ठेवू शकतात असेही त्यांनी सांगितले.
“नोकरदार महिलांची सद्यस्थिती : तारेवरची कसरत” विषयी डॉ. योगिता सुलक्षणे यांनी, नोकरी करणाऱ्या महिलांची होणारी कुचंबणा व समस्यांवर प्रकाश टाकला. यावेळी उपस्थित महिलांना बोलके करीत त्यांनी कुटुंब, नोकरी सांभाळून स्वतःला देखील वेळ द्यावा असे आवाहन केले. यानंतर प्राध्यापिका, डॉक्टर्स, पाठ्यनिर्देशिका, वरिष्ठ व कनिष्ठ निवासी, परिचारिका संवर्ग, कर्मचारी, कक्षसेविका, सफाई कामगार आदी १२० महिलांचा सन्मान करण्यात आला.
यानंतर अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर असून वैद्यकीय क्षेत्रामध्ये देखील मोठ्या जिद्दीने पुढे येऊन वैद्यकीय सेवा करीत आहेत. अध्यापन करीत आहेत. मात्र महत्त्वाच्या जबाबदाऱ्या स्वीकारतांना त्या संकोचतात असे चित्र दिसते. हे चित्र बदलायला हवे. महिलांनी महत्वाच्या जबाबदाऱ्या घेण्यासाठी पुढे आले पाहिजे, असे ते म्हणाले.
सूत्रसंचालन जनसंपर्क सहाय्यक विश्वजीत चौधरी यांनी तर आभार डॉ.राजश्री खंडागळे यांनी मानले. यशस्वीतेसाठी डॉ. योगिता बावस्कर, डॉ. संगीता गावित, डॉ. अंजली वासडीकर, डॉ. धनश्री पाटील, डॉ. मोनिका युनाती, अजय जाधव, भरत पाटील, विद्या सूर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले.