Home क्राईम शेतातील वादातून महिलेचा विनयभंग व मारहाण ; फत्तेपूर पोलिसांत गुन्हा दाखल

शेतातील वादातून महिलेचा विनयभंग व मारहाण ; फत्तेपूर पोलिसांत गुन्हा दाखल


जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील कापूसवाडी येथे शेतातील किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका ४२ वर्षीय महिलेचा विनयभंग करून तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी फत्तेपूर पोलीस स्टेशनमध्ये दोन संशयित आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत महिला यांचे आणि संशयित आरोपी भरतसिंग नाईक व नरेंद्र नाईक यांचे शेत लागून आहे. २८ मार्च रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास, ‘तुम्ही तुमचे ट्रॅक्टर माझ्या जागेत का लावता?’ आणि ‘कपडे धुण्याचे सांडपाणी माझ्या शेताच्या बांधावर का सोडता?’ या कारणावरून वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यावर आरोपी भरतसिंग जामंसिंग नाईक आणि नरेंद्र भरतसिंग नाईक यांनी फिर्यादीला अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

यावेळी संशयित आरोपींनी महिलेचा हात पकडून वाईट उद्देशाने ओढले, तसेच त्यांच्या साडीचा पदर ओढून विनयभंग केला. इतक्यावरच न थांबता पीडितेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच त्यांनी पिडीत महिलेला धमकी दिली की, “मी डॉक्टर आहे आणि माझा भाऊ वकील आहे, तुझे सर्टिफिकेट कसे बनवायचे ते मला चांगले माहीत आहे, तुम्ही आमचे काहीच करू शकणार नाही.” या घटनेनंतर पीडित महिलेने फत्तेपूर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


Protected Content

Play sound