चाळीसगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील दहीवद येथील एका महिलेला उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत १०० रूपयात मिळणारा गॅस २ हजार रूपयांमध्ये देवून फसवणूक केल्याचा प्रकार २३ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार वाजता उघडकीला आला आहे. याप्रकरणी बुधवारी २८ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता गॅस एजन्सीचे मालकासह इतर दोन जणांविरोधात मेहुणबारे पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भारत सरकारच्या उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत गरीब गरजू महिलांना १०० रूपयांमध्ये गॅस देण्याची योजना राबविण्यात येत आहे. असे असतांना चाळीसगाव तालुक्यातील दहीवद या गावात राहणाऱ्या महिला प्रज्ञा नितीन देवरे वय ३० या महिलेला राजेश्वरी गॅस एजन्सीचे मालक मयूर जाधव, ऋषीकेश सुरेश मोरे आणि प्रविण भावराव अहिरे सर्व रा. चाळीसगाव यांनी १०० रूपयात मिळणार गॅस २ हजार रूपयांमध्ये देवून फसवणूक केली. या महिलेसह परिसरातील महिलांची देखील फसवणूक केली आहे. हा प्रकार २३ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार वाजता उघडकीला आल्यानंतर महिलेने मेहुणबारे पोलीस ठाण्यात धाव घेवून फसवणूक करणाऱ्या तिघांविरोधात तक्रार दिली. त्यानुसार बुधवारी २८ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता राजेश्वरी गॅस एजन्सीचे मालक मयूर जाधव, ऋषीकेश सुरेश मोरे आणि प्रविण भावराव अहिरे सर्व रा. चाळीसगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात अला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी हे करीत आहे.