जळगाव प्रतिनिधी | जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या बंदी महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न आज घडल्याने खळबळ उडाली असून त्या महिलेची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती कारागृह प्रशासनाने दिली आहे. तर या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, कारागृहातील बॅरेक क्रमांक २ मध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयित अनिता चावरे या बंदी महिलेने साडीचा पदरचा काठ कापून बॅरेकमधील पंख्याला गळफास घेण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने दुर्घटना टळली.
कारागृह अधीक्षक नियमित पाहणीसाठी येत असल्याने तुरुंग रक्षक उषा भोंबे यांनी सर्व महिला कैद्यांना बँरेकच्या बाहेर काढून रांगेत बसविले. याचवेळी संशयित अनिता चावरे यांनी बाथरुमला जायचे सांगून निघून गेली. त्यानंतर अनिता ही बॅरेक २ मध्ये आली. याठिकाणी तीने साडीचा पदर कापून त्याच्या सहाय्याने तसेच इतर महिला कैद्यांचा बिछान्याच्या घड्या करुन त्यावर उभी राहून बॅरेकमधील पंख्याला गळफास घेण्याचा प्रयत्न केला. कारागृह कर्मचारी साफसफाईची पाहणी करण्यासाठी आले असता त्यांच्या प्रकार निदर्शनास आला. त्यांनी तत्काळ अनिता चावरे यांना पकडून ठेवत इतर कर्मचार्यांना बोलावले. व अनिता चावरे यांच्या गळ्यातील फास काढण्यात येवून बांधलेली दोरी तोडून खाली उतरविले. कौटुंबिक नैराश्यातून आत्महत्या करत असल्याची माहिती अनिता चावरे यांनी कारागृह कर्मचार्यांना दिली आहे. असेही उषा भोंबे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे.
दरम्यान, याप्रकरणी जिल्हा कारागृहातील महिला रक्षक उषा मुरलीधर भोम्बे यांच्या फिर्यादीवरुन जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी अनिता चावरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार पुरूषोत्तम वागळे हे करीत आहेत.