सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पाल वृंदावन धाम येथे पार पडलेल्या भव्य गुरुपौर्णिमा महोत्सवात सदगुरुंच्या महत्त्वावर भर देत श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज यांनी लाखो चैतन्य साधकांना सद्गुरु उपासनेचा दिव्य उपदेश दिला. “ज्याप्रमाणे सूर्याच्या प्रकाशाने अंधार नष्ट होतो, त्याचप्रमाणे गुरूंच्या ज्ञानतेजामुळे साधकाच्या आयुष्यातील अज्ञानरूपी अंधार नाहीसा होतो,” असे ते म्हणाले. त्यांनी स्पष्ट सांगितले की, “सदगुरू हेच मुक्तीचे खरे साधन आहेत. गुरू हे ईश्वराहूनही मोठे असतात कारण ते जन्ममरणाच्या चक्रातून मुक्तीचा मार्ग दाखवतात.”
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सकाळी पाच वाजता परम पूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजींच्या श्री हरी मंदिरातील समाधी स्थळी, त्यांच्या कृपापात्र शिष्य संत गोपाल चैतन्य जी महाराज यांच्या हस्ते अत्यंत भक्तिभावाने सदगुरु पादुका पूजन संपन्न झाले. या पूजनात देशभरातून आलेल्या चैतन्य साधकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला.

या दिवशी हजारो भक्तांनी आपली पूर्व जीवनशैली मागे टाकत मांसाहार आणि व्यसनांचा संपूर्ण त्याग करून साधक होण्याची गुरुदिक्षा घेतली. ही गुरुदिक्षा संत गोपाल चैतन्य जी महाराज यांच्या पावन उपस्थितीत दिली गेली. त्यामुळे अनेक भक्तांनी आपल्या जीवनात नवचैतन्याचा संचार अनुभवला.
गुरुपौर्णिमा पर्वानिमित्त देशभरातील चैतन्य साधक समित्यांचे प्रतिनिधी, भक्ती सभा सदस्य, ध्यान केंद्रधारी यांचा सन्मानही महाराजांच्या हस्ते करण्यात आला. विशेष म्हणजे मध्यप्रदेशातील खंडवा, खरगोन, इंदोर आणि महाराष्ट्रातील कन्नड, संभाजीनगर येथून आलेल्या चैतन्य साधकांनी तब्बल 300 किलोमीटर अंतर पायी पार करत पाल आश्रमात आगमन केले. त्यांच्या स्वागतासाठी व प्रसाद व्यवस्थेसाठी चैतन्य युवा समिती आणि चैतन्य साधक परिवाराच्या वतीने नियोजन करण्यात आले होते.
गुरुपौर्णिमा उत्सवाचे औचित्य साधून मुख्यमंत्री सहायता निधी, धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष व संत श्री लक्ष्मण चैतन्य आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सामुदायिक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात हृदयरोग, हाडांचे विकार, बालरोग, मुखरोग, नेत्ररोग, दंतरोग आदी तपासण्या तसेच आयुर्वेदिक उपचार मोफत करण्यात आले. शिबिरास सिव्हिल सर्जन डॉ. किरण पाटील यांनीही भेट दिली. यामध्ये हजारो नागरिकांनी सहभाग घेत आरोग्यसेवा घेतली.
या महोत्सवाच्या वेळी डिजिटल युगाचा स्वीकार करत चैतन्य स्वयंसेवकांनी एक खास वेबसाईट सादर केली. या वेबसाईटद्वारे देशभरातील साधक पूज्य बापूजी व बाबाजी यांचे सत्संग, सेवा व ज्ञान मार्ग डिजिटल स्वरूपात अनुभवू शकणार आहेत. तसंच, चैतन्य साधक परिवाराने दहावी व बारावी परीक्षेत उत्तम गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरवही संत गोपाल चैतन्य महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. चैतन्य साधक परिवारातर्फे दहावी व बारावीत पंचायत्तर टक्यांच्या वर गुण प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाण पत्र देऊन पदस्थ श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या गुरुपौर्णिमा महोत्सवात आश्रम समर्पित श्री श्याम चैतन्य, शिव चैतन्य, दिव्य चैतन्य, ब्रज चैतन्य, नवनीत चैतन्य, राधे चैतन्य, रमण चैतन्य,हरीश चैतन्य,सर्व चैतन्य,ऋषीं चैतन्य, शुभ चैतन्य, ललित चैतन्य ,राम चैतन्य,सह मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक, भिकनगाव आमदार झूमा सोलंकी, एन एस यू आय सरचिटणीस धनंजय चौधरी, भाजपा महिला प्रदेश अध्यक्ष केतकी पाटील,राज्य परिषद सदस्य गोमती बारेला,भाजप प्रदेश सदस्य उत्तमराव राठोड,तहसीलदार बंडू कापसे,पोलीस निरीक्षक विशाल जायसवाल, पाल उपनिरीक्षक अविनाश राठोड,शाश्रज्ञ् कृषी विज्ञान केंद्र महेश महाजन, गट शिक्षण अधिकारी चव्हाण मॅडम,आदी सह लाखो चैतन्य साधक परिवारानी पूज्य बापूजी समाधी दर्शन व सत्संग अमृताचा लाभ घेतला.
गुरुपौर्णिमा महोत्सवात आश्रम समर्पित विविध चैतन्य कार्यकर्ते, राजकीय, प्रशासकीय अधिकारी व हजारो भाविक उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत संत गोपाल चैतन्य महाराज यांचे प्रवचन, पूजन, दिंडी स्वागत, आरोग्य शिबिर, महाप्रसाद व सत्कार सोहळा अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला.



