मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज, वृत्तसेवा | विधान परिषदेची निवडणूकीसाठी आज माघारीची अंतिम मुदत आहे. दुपारी ३ वाजेनंतरच निवडणुकी बिनविरोध की राज्यसभेप्रमाणेच चुरस असणार यावर आज शिक्कामोर्तब होणार आहे.
राज्यसभा निवडणुकीचे निकाल धक्कादायक आले आहेत. त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध व्हावी, असे प्रयत्न सुरू आहेत. विधान परिषदेसाठी १० जागा असून ११ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी २० जून रोजी मतदान होणार असून माघार नाही झाली तर निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता आहे. राज्यसभेच्या निकालामुळे महाविकास आघाडीत परस्परांविषयी निर्माण झालेल्या अविश्वासाच्या वातावरणानंतर कोणीच माघार घेण्याच्या मनस्थितीत नसल्याचेच दिसून येत आहे.
विधानपरिषदेसाठी काँग्रेसला पुरेशी मते नाहीत. तरी काँग्रेसने चंद्रकात हंडोरे आणि भाई जगताप हे दोन उमेदवार दिले असून निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. शिवसेनेचे सचिन अहिर, आमशा पाडवी आणि राष्ट्रवादीचे रामराजे नाईक-निंबाळकर आणि एकनाथराव खडसे असे प्रत्येकी दोन उमेदवार येतील एवढे पुरसे पाठबळ त्यांच्याकडे आहे.
भाजपाने प्रवीण दरेकर, राम शिंदे, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे असे पाच आणि सदाभाऊ खोत अपक्ष असे सहाही जागा जिंकण्याचा निर्धार भाजपने केला आहे. त्यांच्याकडे सहा उमेदवार निवडून येतील, एवढय़ा मतांचे गणित जुळणे अवघड आहे. तर सदाभाऊ खोत यांनी पक्षाचा अधिकृत उमेद्वार निवडून यावा यासाठी माघार घेण्याची सूचना केली तर, माघारीच्या पार्श्वभूमीवर आज, दुपारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत काही तोडगा निघेल अन्यथा विधान परिषद निवडणूकदेखील राज्यसभेप्रमाणे चुरशीची होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.