कासोदा (राहुल मराठे) तालुक्यात सध्या तापमानाने आज उच्चांक गाठला असून पारा ४६ ते ४८ अंशांवर पोहोचला आहे. या वाढलेल्या तापमानात लगीनसराईही जोरात असुन यासाठी सर्वसामान्याना लग्न समारंभास जाण्यासाठी एसटी बसचा प्रवास सोयीचा वाटत असतो. त्या दृष्टीने प्रवासी आपापल्या गावातील बसथांब्यावर येतात मात्र तालुक्यातील अनेक गावात आजही प्रवासी निवारे नसल्याने प्रवासी महिला, लहान मुले आणि जेष्ठ नागरिक यांचे उन्हात हाल होत आहेत. लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष असल्याने प्रवाशांमधून संतप्त भावना व्यक्त होत आहेत.
या संदर्भातील वृत असे की, एरंडोल तालुक्यातील बऱ्याच गावात आजही प्रवाशी निवारे नसल्याचे निदर्शनास आले आहे. कासोदा, आडगाव, तळई, अंतुर्ली खुर्दे, जवखेडे, खडके, अशा मोठ्या गावांसह अनेक लहान गावातही प्रवासी निवारे नसल्याने ग्रामस्थांना रणरणत्या उन्हात व पावसाळ्यात बसची वाट बघत, कुटुंबासह उघड्यावर अथवा झाडांखाली थांबावे लागते. या सर्व प्रकारामुळे अखेर एरंडोल,पारोळा, विधानसभा क्षेत्रातले कासोदा गाव हे आमदारांनी दत्तक घेतलेले गांव आहे. तसेच जि.प. अध्यक्षाही याच गावातील असूनही एवढ्या मोठ्या गावठी साधे बस शेड अद्याप झालेले नाही. एरंडोल तालुक्याला दोन दोन लोकप्रतिनिधी, आमदार तसेच जिल्हा परिषद अध्यक्षा असतांनाही ही स्थिती असल्याने संतप्त प्रवासी व सुज्ञ नागरिक हवालदिल झाले आहेत. कासोदा बस स्टॉप शेडजवळ अनाधिकृत धंदेही चालत असुन त्या ठिकाणी बससुद्धा थांबत नाही तर वनकोठे येथे बसशेडचे पत्रे तुटल्याने तेथे बस शेड असूनही प्रवाशी तेथे उभे राहू शकत नाहीत. या महत्वाच्या प्रश्नाकडे लोक प्रतिनिधींनी लक्ष देवुन या सर्व ठिकाणी त्वरित प्रवाशी निवारे बांधावे अशी मागणी केली जात आहे.