पुणे (वृत्तसंस्था) ‘महा’ चक्रीवादळाचा परिणामामुळे राज्यात 7 नोव्हेंबरपर्यंत पाऊस राहणार असल्याचा अंदाज आहे. कोकणासह, पुणे, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील 48 तास काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, अशी शक्यता पुणे हवामान खात्याने वर्तवली आहे.
पुणे हवामान खात्याने दिलेल्या इशारा नुसार 3 नोव्हेंबरनंतर पाऊस कमी होईल. मात्र पुन्हा 6 नोव्हेंबरनंतर महाचक्रीवादळाचा परिणाम जाणवू लागेल. त्या दरम्यान पुण्यासह उत्तर-मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. समुद्रावर निर्माण झालेले क्यार वादळ पूर्णपणे शमले आहे. मात्र सध्या सक्रिय असलेल्या महाचक्रीवादळापाठोपाठ आणखी एक चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता असल्याने पाऊस नेमका कधी थांबणार याबद्दल सांगता येणे शक्य नसल्याचे वेधशाळेने स्पष्ट केले आहे.