नवी दिल्ली । काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या उद्याच्या बैठकीआधी पक्षातील २३ वरिष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षात आमूलाग्र बदल करण्याची विनंती केली आहे. यामुळे आता सोमवारच्या बैठकीत मोठे निर्णय होण्याची शक्यता बळावली आहे.
मागील काही वर्षांपासून बॅकफूटवर गेलेल्या काँग्रेसमध्ये फेरबदलाची चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर सोनिया गांधी यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. त्यांच्या निवडीला वर्ष झालं असून, काँग्रेसमधील २३ वरिष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पक्षाला उभारी देण्यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. काँग्रेस अध्यक्षांच्या निवडीसह पक्षामध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत फेरबदल करण्याची मागणीही या नेत्यांनी केली आहे. याबाबत इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे.
या वृत्तानुसार, काँग्रेसच्या २३ नेत्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून वरपासून खालपर्यंत बदल करण्याची मागणी केली आहे. ज्यांनी हे पत्र लिहिले त्यांच्यात ५ माजी मुख्यमंत्री, काँग्रेस कार्यकारिणी सदस्य, खासदार आणि अनेक माजी केंद्रीय मंत्री यांचा समावेश होता. या मुद्दयावरून सोमवारी सकाळी ११ वाजता काँग्रेस कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली आहे. या पत्रात भाजप सातत्याने पुढे जात असल्याचे नमूद केले आहे, मागील निवडणुकीत तरुणांनी नरेंद्र मोदींना जोरदार मतदान केले. काँग्रेसचा आधार घसरण आणि तरुणांचा आत्मविश्वास तुटत असल्याबद्दल गंभीर चिंता निर्माण झाली आहे. असे सांगितले जात आहे की सुमारे १५ दिवसांपूर्वी पाठविलेल्या या पत्राने बदलाचा असा अजेंडा दिला आहे, ज्यांची चर्चा सध्याच्या नेतृत्वाला स्पर्श करू शकते असे यात म्हटले आहे.
या पत्रात तीन मागण्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये पूर्ण वेळ प्रभावी नेतृत्व असावे. काँग्रेस कार्यकारी समिती निवडणुका घेण्यात याव्यात आणि पक्षात संस्थात्मक नेतृत्व यंत्रणा तातडीने तयार करावी जेणेकरून पक्षाला नवजीवन मिळण्यासाठी मार्गदर्शन करता येईल या मागण्यांचा समावेश आहे.
या पत्रावर गुलाम नबी आझाद; आनंद शर्मा; कपिल सिब्बल; मनीष तिवारी, शशी थरूर, विवेक तंखा, मुकुल वासनिक, जितिन प्रसाद, भूपेंद्रसिंग हूडा, राजिंदर कौल भट्टल, एम. वीरप्पा मोईली, पृथ्वीराज चव्हाण, पीजे कुरियन, अजय सिंह, रेणुका चौधरी, मिलिंद देवरा, राज बब्बर, अरविंदसिंग लवली, कौलसिंह ठाकूर, अखिलेश प्रताप सिंह, कुलदीप शर्मा, योगानंद शास्त्री व संदीप दीक्षित यांच्या स्वाक्षर्या आहेत.