जळगाव प्रतिनिधी । जळगाव वनपरिक्षेत्रातंर्गत येणाऱ्या जळगाव विमानतळ परिसरात दोन बिबट्यांना पहाटे तीन वाजेच्या सुमारास जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. विमानतळ परीसरात गेल्या आठवड्यापासून बिबट्यांचा वावर असल्याने रहिवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आज पहाटे बिबट्यांना जेरबंद केल्यानंतर सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.
जळगाव वनविभागाचे उपवनसंरक्षक दिगंबर पगार यांनी विमान उतरण्यास व उड्डाण होण्यास तसेच प्रवाश्यांच्या सुरक्षिततेस धोका होण्याबाबत कळविले होते. सातत्याने दोन बिबट्यांचा बंदोबस्त करण्याकामी गेल्या महिन्या भरापासून त्यांच्या अधिनस्त क्षेत्रीय कर्मचाऱ्यांसह शोध मोहिम राबविली. यामध्ये ट्रॅप कॅमेरा, विमानतळ प्राधिकरणाचे सीसीटीव्ही फुटेज व वनविभागाचे सीसीटीव्ही फुटेज यांचा वापर करण्यात आला. या परिस्थितीबाबत वरिष्ठांना वेळोवेळी अहवालही सादर करण्यात आला.
या घटनेचे गांर्भीय लक्षात उपवनसंरक्षक, जळगाव यांनी वरिष्ठ अधिकारी यांच्या परवानगीने दोन बिबट वन्यजीव प्राणी यांना सुरक्षित व कोणत्याही प्रकारची इजा न होता पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्याबाबत परवानगी मिळाविली होती. वनविभागाकडून विमानतळ परिसरात संभावित जागेवर ठिकठिकाणी कॅमेरा ट्रॅप बसविण्यात येवून जळगाव वनक्षेत्रातील क्षेत्रीय कर्मचारी यांनी अहोरात्र गस्त करुन बिबटाच्या हालचालीची नोंद घेवून त्याप्रमाणे दोन ठिकाणी पूर्वपरवानगीने पिंजरे बसविण्यात आले. विमानतळाचा परिसर 750 एकर असल्याने दिगंबर पगार, उपवनसंरक्षक,जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली एन. जी. पाटील, , जळगाव यांनी वनपरिक्षेत्रातील क्षेत्रिय कर्मचारी यांच्या मदतीने सदरील दोन बिबट ट्रॅप कॅमेरे व सीसीटीव्ही फुटेज यांचा पुरेपुर उपयोग करुन त्याचप्रमाणे श्री. राजेश ठोंबरे, मानव वन्यजीव रक्षक व विवेक देसाई, वन्यजीव अभ्यासक यांची मदत घेवून 14 जुन, 2019 रोजी पहाटे 3.00 वाजता पिंजऱ्यांमध्ये दोन बिबट जेरबंद करण्यात सफलता प्राप्त झाली. बैद्यकीय अधिकारी संजय खाचणे यांनी दोन बिबट्यांची पुर्णपणे तपासणी करण्यात आली. त्यांनी दोन्ही बिबट सुदृढ असल्याचे सांगितले. व त्यांना कोणत्याही प्रकारची इजा झालेली दिसून आलेली नाही.
यांनी घेतले परिश्रम
या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी उपवनसंरक्षक डी. डब्लू. पगार, वनपरिक्षेत्र अधिकारी एन. जी. पाटील, मानव वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे, वन्यजीव अभ्यासक विवेक देसाई, वनपाल पी.जे. सोनवणे, सी.व्ही. पाटील, दिपक पाटील, उल्हास पाटील, जितेंद्र चिंचोले, अश्विनी ठाकरे, वैशाली साळी व डी. डी. पवार सर्व वनरक्षक जळगाव व वनमजुर, जळगाव वनक्षेत्र यांनी परिश्रम घेतले.
– कोट
विमानतळाच्या परिसरातील बिबिटे पकडण्याची परवानगी मिळाल्याने दोन दिवसांपासून या ठिकाणी दोन पिंजरे लावून बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी एक बोकड भक्षक म्हणून बांधण्यात आला होता. तर काही पिंजऱ्यात मांस तुकडे ठेवण्यात आल्याने दोन्ही बिबटे जेरबंद झाले.
– एन. जी. पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी, जळगाव