नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अयोध्येतील रामजन्मभूमी- बाबरी मशीद प्रकरणातील जमिनीच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली असून हा जमिनीशी नव्हे तर धार्मिक भावनांशी जोडलेला प्रश्न आहे. या प्रकरणात आम्ही दिलेला निर्णय हा दोन्ही पक्षकारांना मान्य असेल का असा प्रश्नही सर्वोच्च न्यायालयाने यावेळी केला आहे. दरम्यान, मध्यस्थाच्या नियुक्तीवर मात्र आज निर्णय होण्याची शक्यता आहे. मध्यस्थीसाठी हिंदू महासभेच्या वकिलांनी विरोध केला आहे. निर्मोही आखाडा आणि मुस्लिम पक्षकार मात्र चर्चेसाठी तयार आहेत.
राममंदिराबाबत आज सर्वोच्च न्यायालय आज निकाल देण्याची शक्यता होती, मात्र आता हा निकाल न्यायालयाने राखून ठेवला असून मध्यस्थीसाठी प्रत्येक पक्षकाराने नावे द्यावीत आणि चर्चेसाठी प्रत्येक पक्षकाराने समोर यावे असे सांगितले आहे. सुप्रीम कोर्टाच्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठात ही सुनावणी सुरू असून त्याचे नेतृत्व सरन्यायाधीश रंजन गोगोई करत आहेत. न्यायालयाने सर्वच पक्षकारांना मध्यस्थीसाठी प्रतिनिधीचे नाव सूचविण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु, आता या चर्चेसाठी एकापेक्षा अधिक मध्यस्थांची नियुक्ती होणार अशी चिन्हे आहेत. यावेळी जस्टिस एसए बोबडे म्हणाले, हा मन आणि मेंदूतील नाते सुधारण्याचा प्रयत्न आहे. आम्हाला या प्रकरणाच्या गांभीर्याची जाणीव आहे. आम्हाली जाणीव आहे, की याचे परिणाम काय होतील. आम्हाला इतिहास सुद्धा माहिती आहे. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की बाबरने जे काही केले त्यावर आमचे नियंत्रण नव्हते. त्याला कुणीच बदलू शकत नाही. वाद सोडवण्याकडे आमचा प्रयत्न सुरू आहे. आम्ही हा वाद मिटवू शकतो. यापुढे बोलताना न्यायाधीश म्हणाले, मध्यस्थता प्रकरणी गुप्तता अतिशय महत्वाची आहे. परंतु, कुठल्याही पक्षकाराने माहिती लीक केल्यास ते माध्यमांमध्ये पसरण्यापासून आम्ही कसे रोखणार? असे देखील कोर्टाने म्हटले आहे.