राहुल गांधी केरळमधून निवडणूक लढविण्याची शक्यता

तिरुवनंतपूरम (वृत्तसंस्था) दक्षिण भारतात अधिकाधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य काँग्रेसने ठेवले असून त्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी दक्षिण भारतातून उमेदवारी दाखल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे राहुल गांधी अमेठीसह केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातूनदेखील निवडणूक लढवण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, काँग्रेस महासचिव आणि केरळचे माजी मुख्यमंत्री ओमेन चंडी यांनी याबाबत माहिती दिली आहे.

 

राहुल गांधी यांना केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची विनंती करण्यात आली असल्याचे ओमेन चंडी यांनी सांगितले. वायनाड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे एम. एल. शाहनवाज यांनी दोन वेळेस विजय मिळवला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना केरळचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मुल्लापल्ली रामचंद्रन यांनी सांगितले, या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याबाबत राहुल गांधी यांच्यासोबत मागील एक महिन्यापासून चर्चा सुरू आहे. राहुल गांधी यांनी केरळमधून निवडणूक लढवण्यास होकार दिल्यास दक्षिण भारतातील अन्य राज्यातही याचा परिणाम होऊन काँग्रेससाठी सकारात्मक वातावरण तयार होईल अशी माहिती सूत्रांनी दिली.

Add Comment

Protected Content