चंदीगड, वृत्तसंस्था | पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशी वाद झाल्यानंतर मंत्रिपदाचा राजीनामा देऊन त्यांच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडलेले काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांचे मंत्रिमंडळात पुनरागमन होण्याची चर्चा जोरात आहे. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांच्या मध्यस्थीमुळे सिद्धू मंत्रिमंडळात परतणार असून त्यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
सिद्धूंना मंत्रिमंडळात पुन्हा घेण्यासाठी प्रियंका गांधी यांनी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशी चर्चा केली आहे. पंजाब काँग्रेसच्या आमदारांमध्ये नाराजी आहे. त्यातच सिद्धू यांना आपल्याकडे खेचण्यासाठी भाजप आणि आम आदमी पार्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे सिद्धूंना मंत्रिमंडळाबाहेर ठेवून चालणार नसल्याचे काँग्रेस हायकमांडचे मत आहे.
त्यामुळेच सिद्धूंना परत मंत्रिमंडळात घेऊन त्यांना ऊर्जा मंत्रिपद देण्याऐवजी उपमुख्यमंत्रिपद देण्याचे काँग्रेसमध्ये घाटत आहे. त्यासाठी स्वत: प्रियंका गांधी यांनी पुढाकार घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले. सिद्धूंना उपमुख्यमंत्रिपद देण्याच्या वृत्ताचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनी खंडनही केलेले नाही. हायकमांड जो निर्णय घेतील, तो आम्हा सर्वांना मान्य असेल, असे जाखड यांनी स्पष्ट केल्याने सिद्धू पुन्हा मंत्री होण्याची शक्यता अधिक बळावली आहे.माजी क्रिकेटपटू सिद्धू पूर्वी भारतीय जनता पक्षात होते. त्यांनी २०१७मध्ये राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेसला चांगली कामगिरी करता आली नाही, त्याचे खापर सिद्धू यांनी अप्रत्यक्षपणे अमरिंदरसिंग यांच्यावर फोडले होते. मुख्यमंत्र्यांनीही मग सिद्धूच्या बेजबाबदार वक्तव्यांमुळे पक्ष अडचणीत आल्याचे जाहीरपणे सांगितल्याने उभय नेत्यांतील वाद, खासदार राहुल गांधी आणि अन्य पक्षश्रेष्ठींपुढेही गेला होता. राज्य मंत्रिमंडळात जूनमध्ये खातेबदल करण्यात आले होते. त्यात सिद्धूकडील पर्यटन आणि सांस्कृतिक व्यवहार खाते काढून घेण्यात आले होते. त्यांच्याकडे वीज आणि अपारंपरिक ऊर्जा खाते सोपवण्यात आले होते. ते स्वीकारण्यास सिद्धूने नकार दिला होता. त्यावर विरोधकांनीही टीका सुरू केली होती. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या सिद्धूंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.