धरणगाव (प्रतिनिधी) नगराध्यक्ष पद सांभाळणे खरं तर हे एक आव्हानच असते. या पदावर कार्यरत असताना सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून संपूर्ण गावाचा सर्वांगीण विकास साधायचा असतो. त्यामुळे आरोग्य, स्वच्छतेसह रोजगार निर्मिती आणि पालिकेचे कर्मचारी-अधिकार्यांची कार्यक्षमता वाढविण्यावर मी भर देणार असल्याची ग्वाही लोकनियुक्त नगराध्यक्षपदाचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार निलेश सुरेश चौधरी यांनी दिली आहे.
‘लाइव्ह ट्रेंड्स न्यूज’ दिलेल्या विशेष मुलाखतीत निलेश चौधरी म्हणाले की, ऐन विधानसभा निवडणूक संपल्या बरोबर पोटनिवडणूकीची उमेदवारी मला देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, नगराध्यक्षपदाची निवडणूक लढण्याची जबाबदारी पहिल्यांदा माझ्याकडे आल्याने ती पेलणे माझ्यासाठी एक आव्हानच आहे. परंतु, उद्योग, सामाजिक, सहकार आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून काम करण्यापासून तर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीपर्यंत पोहोचल्याने, या दरम्यानच्या प्रशासनाच्या अनुभवामुळे हे पद मला सांभाळणे सहज शक्य होईल, याचा मला पूर्ण विश्वास आहे. माजी मंत्री तथा विद्यमान आमदार गुलाबराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष सुरेशनाना चौधरी या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मी धरणगावच्या विकासाठी कटिबद्ध आहे. स्व. सलीमभाई पटेल यांनी धरणगावच्या विकासाचा जो आलेख उंचावलेला आहे. तो आलेख मी अधिक उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल. यासाठी मला पालिकेतील गटनेते विनय भावे, शहरध्यक्ष राजेंद्र महाजन, राजेंद्र ठाकरे, माजी प्रभारी नगराध्यक्ष वासुदेव चौधरी, सुरेखाताई विजय महाजन, विद्यमान प्रभारी नगराध्यक्ष अंजलीताई विसावे यांच्यासह सर्व नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची मदत मिळणार असल्याचेही निलेश चौधरी यांनी सांगितले.
धरण्गावातील जनतेच्या तक्रारीचा त्वरित निपटारा व्हावा, समस्याग्रस्तांना सुविधा मिळावी म्हणून पालिकेच्या कारभारात गतिमानता आणून प्रशासन आणि जनता यांचा थेट संवाद घडविण्याचा प्रयत्न करेल. सुशासनासाठी माहिती तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर केला जाईल. पालिकेतील अधिकारी कर्मचार्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी कार्यशाळा घेण्यात येईल. पारदर्शकता आणि गतिमानता या दोघांचा वापर करून सुशासन देण्यात येईल. मागील तीन वर्षात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली धरणगाव शहरात झालेला विकास हे वेगळं सांगण्याची गरज नाही. गेल्या तीन वर्षांत धरणगाव पालिकेतील कारभार अतिशय उत्तम असे चालला आहे. आगामी काळात पालिकेच्या माध्यमातून आपला रोजगार निर्मितीवर भर असेल, असेही श्री.चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.