‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमातून मिळतील अनेक संदेश – जयशंकर

modi and trump

ह्युस्टन, वृत्तसंस्था | येथे उद्या (दि.२२) होणाऱ्या ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमात अनेक संदेश दडलेले आहेत. यातून काय घ्यायचे ते पाकिस्तान ठरवेल, असे भारतीय विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. या कार्यक्रमाला अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची उपस्थिती ही सन्मानाची बाब आहे असेही ते म्हणाले.

 

या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांना भेटणार आहेत. त्यानंतर मंगळवारी न्यूयॉर्कमध्ये नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात बैठक होईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. ७४ व्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प न्यूयॉर्कमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांसोबत चर्चा करणार आहेत.

ह्युस्टन येथे होणारा ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रम आटोपल्यानंतर ट्रम्प रविवारी रात्री न्यूयॉर्कमध्ये येण्याची शक्यता आहे. ट्रम्प आणि मोदी या कार्यक्रमात ५० हजार भारतीय-अमेरिकन नागरिकांना संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमातून भारत-अमेरिका संबंध बळकट असल्याचा संदेश जाईल, तसेच ट्रम्प त्यांच्या आगामी भारत दौऱ्याची सुद्धा घोषणा करु शकतात.

मंगळवारी ट्रम्प यांचे संयुक्त राष्ट्रामध्ये भाषण होईल. त्यानंतर अन्य देशांच्या नेत्यांबरोबर त्यांचा द्विपक्षीय चर्चेचा कार्यक्रम ठरलेला आहे. मोदी-ट्रम्प यांच्या बैठकीत द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्याच्या दिशेने पावले उचलली जातील. ट्रम्प यांची भारत आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांबरोबर चर्चा होईल. त्यावेळी साहजिकच काश्मीर मुद्दा असेल. पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यावर अधिक जोर देतील. पंतप्रधान मोदी यांनी याआधी ट्रम्प यांच्यासमोरच काश्मीर भारताचा अंतर्गत विषय असल्याचे स्पष्ट केले होते.

Protected Content