जळगाव , प्रतिनिधी | देशात महिलांचे प्रश्न गंभीर बनले आहेत. यासोबतच बेरोजगारी, महागाई या समस्याही वाढीस लागल्या आहेत. महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार असल्यची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, कार्याध्यक्ष विलास पाटील, महिला जिल्हाध्यक्षा कल्पाना पाटील आदी उपस्थित होते.
चित्रा वाघ पुढे म्हणाल्या की, विधानसभेसाठी उमेदवार कोण आहे हे न बघता महिला आघाडीतर्फे चांगल्या तयारीनीशी काम करण्यात येईल. पक्षाने दिलेला उमेदवार निवडून आणण याला प्राधान्य देण्यात येईल. याचाच भाग म्हणून जिल्ह्यातील रावेर वगळता ९ विधानसभांची जबाबदारी महिला पदाधिकाऱ्यांवर टाकण्यात आली आहे. महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, प्रदेशच्या मंगला पाटील, तिलोत्तमा पाटील, जयश्री पाटील यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना विधानसभानिहाय जबादाऱ्या देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. त्यादृष्टीने विधानसभानिहाय बैठकी घेण्यात येत असून शुक्रवारी जिल्हातील महत्त्वाच्या महिला पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येवून या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात येवून तशा सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या. तत्पुर्वी वाघ यांनी जिल्ह्यातील महिला पदाधिकाऱ्यांची बैठक घेत आगामी निवडणुकीसंदर्भात सूचना करत महिला मतदारांची समस्या लक्षात घेत महिलांचे प्रश्न सोडवा, प्रत्येक गावात बैठका घेत महिलांना राष्ट्रवादीचे विचार पटवून द्या, हेवेदावे न करता पक्षाला यश कसे मिळवता येईल याकडे लक्ष देत काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.