जळगाव प्रतिनिधी | भोसरी येथील वादग्रस्त भूखंड हा खडसेंचे जावई गिरीश चौधरी आणि त्यांच्या पत्नी सौ. मंदाकिनी खडसे यांनी संयुक्तरित्या विकत घेतला होता. यामुळे आता गिरीश चौधरींना अटक झाल्यामुळे मंदाताईंवरील कारवाई अटळ असल्याचे मानले जात आहे.
एकनाथराव खडसे हे महसूलमंत्री असतांना भोसरी औद्योगीक वसाहतीमधील एक भूखंड हा नियमांचे उल्लंघन करून त्यांची पत्नी आणि जावई यांनी खरेदी केल्याचे प्रकरण खूप गाजले होते. या प्रकरणी खडसे यांना राजीनामा द्यावा लागला होता. या भूखंडाच्या चौकशीसाठी झोटींग समिती देखील नेमण्यात आली होती. तथापि, या समितीचा अहवाल हा मात्र अद्यापही विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात आला नव्हता. तर स्वत: खडसे यांनी झोटींग समितीचा अहवाल पटलावर मांडण्यासाठी खूप प्रयत्न करून देखील ते शक्य झाले नव्हते. या समितीच्या अहवालामध्ये आपल्याला क्लिन चीट देण्यात आल्याचा दावा त्यांनी अनेकदा जाहीरपणे केला होता.
दरम्यान, भाजप आणि महाविकास आघाडीतील वाद विकोपाला गेल्यानंतर एकनाथराव खडसे यांना ईडीची नोटीस मिळाली होती. त्यांची मुंबईत चौकशी देखील करण्यात आली होती. यानंतर आता थेट त्यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आलेली आहे. या जमिनीची मालकी ही गिरीश चौधरी आणि मंदाकिनी खडसे या दोन्हींच्या नावावर आहे. यामुळे चौधरी यांना अटक झाल्यानंतर मंदाकिनी खडसे यांच्यावर देखील कारवाई अटळ असल्याचे मानले जात आहे. या संदर्भात येत्या काही दिवसांमध्ये गतीमान घडामोडी घडण्याची शक्यता आहे.