Home राजकीय लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार का? मतदानाच्या आधीच अजित पवारांनी दिले स्पष्ट...

लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार का? मतदानाच्या आधीच अजित पवारांनी दिले स्पष्ट उत्तर


मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । राज्यात सध्या महापालिका निवडणुकांचा रणसंग्राम सुरू असून त्याचवेळी ‘लाडकी बहीण योजना’ पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. पात्र महिलांना दोन महिन्यांचे 3000 रुपये मिळणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट भूमिका मांडत या सगळ्या चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

राज्यात येत्या 15 जानेवारी रोजी 29 महापालिकांसाठी मतदान होणार असून 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत. त्यामुळे सध्या सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. सत्ताधारी पक्षाकडून ‘लाडकी बहीण योजना’ हा प्रमुख मुद्दा करत महिला मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होत आहे. याच पार्श्वभूमीवर 14 जानेवारी रोजी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर दोन महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये जमा होणार असल्याची माहिती समोर आली होती.

मात्र मतदानाच्या अगदी एक दिवस आधीच ही रक्कम दिली जात असल्याने निवडणूक आचारसंहितेचा प्रश्न उपस्थित झाला. निवडणूक आयोग यावर आक्षेप घेऊन सरकारला हा हप्ता पुढे ढकलण्याचे आदेश देऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. त्यामुळे अनेक महिलांमध्ये “आता पैसे मिळणार की नाही?” असा संभ्रम निर्माण झाला होता.

या सगळ्या चर्चांदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, राज्य सरकारने 14 जानेवारी रोजी लाडक्या बहिणींना 3000 रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम थेट महिलांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे. मात्र निवडणूक आयोगाने याबाबत आक्षेप घेतल्यास किंवा निर्देश दिल्यास सरकार आयोगाच्या आदेशांचे पालन करेल.

अजित पवार यांनी पुढे स्पष्ट केले की, “निवडणूक आयोगाने सांगितले तर आम्ही लाडकी बहीण योजनेचा हप्ता पुढे ढकलू.” याचा अर्थ आयोगाकडून कोणताही हस्तक्षेप झाला नाही, तर पात्र महिलांना ठरलेल्या तारखेला 3000 रुपयांचा हप्ता मिळणार आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे लागले आहे.


Protected Content

Play sound