जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जिल्ह्यात संसर्ग प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक उपाययोजनामुळे दोन वर्षापासून वन्यप्राणी प्रगणना ठप्प झाली होती. तब्बल दोन वर्षानंतर प्रथमच सोमवारी बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख चंद्रप्रकाशात वन्यजीव प्राणी गणना केली जाणार असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.
दरवर्षी मे महिन्यातील बुद्ध पौर्णिमेला आकाशात चंद्र पूर्ण स्वरुपात आणि चंद्र प्रकाश देखील स्वछ असतो. या चंद्रप्रकाशात जिल्हाभरात वनविभागाकडून वन्यप्राणी प्रगणना केली जाते. उन्हाळ्याच्या दिवसात उशिराने वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी नैसर्गिक तसेच कृत्रिम पाणवठ्यावर येतात. त्यांचे निरीक्षण करण्यासाठी वनविभागाकडून मचाण निर्मिती केलेली असते. वन्यप्राणी प्रगणनेसाठी एका मचाणावर किमान तीन ते पाच वनविभाग अधिकारी, कर्मचारी आणि वन्यजीव प्रेमीकडून प्राण्याचे निरीक्षण केले जाते. या मचाणाचा उपयोग इतर वेळी देखील प्राण्याच्या हालचाली टिपण्यासाठी केला जात असल्याचेही वनविभाग अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
बुध्दपौर्णिमेला चांदण्या रात्रीचा प्रकाश हा अन्य पौर्णिमेच्या रात्रींपेक्षा अधिक प्रखर असतो. त्यामुळे रात्रीच्या सुमारास पाणस्थळे, अभयारण्यांमधील पाणवठ्यांवर तृष्णा भागविण्यासाठी येणारे वन्यप्राणी सहज टिपता येणे शक्य होते. कुठल्या प्रजातीचे वन्यजीव रात्रीतून पाणवठ्यांजवळ किंवा निरिक्षण मनोरे अथवा मचाणजवळून मार्गस्थ झाले तेदेखील सहजरित्या नजरेस पडते. यासाठी कुठल्याही प्रकारे कृत्रिम प्रकाशयोजनेची आवश्यकता भासत नाही. तसेच चांदण्या रात्रीचा प्रकाश नैसर्गिक असल्यामुळे वन्यजीवदेखील फारसे या प्रकाशाला घाबरत नाही.
विवेक देसाई,
मानद वन्यजीव रक्षक जळगाव