Home पर्यावरण मुक्ताईनगरात हिरव्या वृक्षांची सर्रास कत्तल; पर्यावरणप्रेमींचा संताप

मुक्ताईनगरात हिरव्या वृक्षांची सर्रास कत्तल; पर्यावरणप्रेमींचा संताप


मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर शहरातील प्रमुख रस्त्यांलगत सार्वजनिक ठिकाणी असलेल्या हिरव्यागार वृक्षांची सर्रास तोड सुरू असल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. व्यापारी आस्थापनांकडून रस्त्यांवरील अतिक्रमणासोबतच वृक्षतोडीच्या घटनाही वाढल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, या वृक्षतोडीसाठी नगरपंचायत आणि महसूल प्रशासनाचीच परवानगी असल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

मुक्ताईनगर शहरातील भुसावळ-जळगाव, बोदवड-जामनेर-मलकापूर, बुरहानपूर आणि जुन्या गावाकडे जाणारे असे चार मुख्य रस्ते आहेत. या रस्त्यांच्या दुतर्फा व्यापारी आस्थापनांनी अतिक्रमण करून पादचाऱ्यांचा मार्ग अडवला आहे. सर्विस रस्ते आणि फुटपाथवर दुकानदारांनी आपल्या वस्तूंचे स्टॉल, फलक आणि जाहिराती लावल्यामुळे शाळा, महाविद्यालय किंवा सरकारी कार्यालयांकडे जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. या अतिक्रमणामुळे वारंवार छोटे-मोठे अपघात होत असतानाही प्रशासन मात्र डोळेझाक करत आहे.

सार्वजनिक ठिकाणी असलेले शंभर वर्षांहून जुने, डेरेदार आणि सावली देणारे सुमारे 100 ते 150 वृक्ष अलीकडेच मुख्य रस्त्यांवरून गायब झालेले दिसत आहेत. दिवसभर वीजपुरवठा बंद करून ही झाडे तोडण्यात आली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या झाडांचा कोणालाही अडथळा नसताना आणि जीवितास धोका नसतानाही नगरपंचायतीकडून वृक्षतोडीला परवानगी देण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. सार्वजनिक मालमत्तेचा नाश करून व्यापारी स्वार्थासाठी वृक्षतोड करण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढला आहे.

प्रशासन आणि व्यापारी वर्गातील या संगनमतावर नागरिक प्रश्न उपस्थित करत आहेत की, सार्वजनिक ठिकाणांवरील झाडे तोडण्याची परवानगी देण्याचा अधिकार नगरपंचायतीकडे आहे का? आणि जर नाही, तर ही परवानगी देण्यात आली कशी? परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? अशा अनेक प्रश्नांनी शहरात चर्चा पेटली आहे.

दरम्यान, या संदर्भात संपर्क साधला असता नगरपंचायत मुख्याधिकारी सुभाष जानोरे यांनी “केवळ फांद्या छाटण्याची परवानगी देण्यात आली होती” असे सांगितले. परंतु बोदवड रोडवरील आणि भुसावळ रोडलगतच्या ठिकाणी झाडे मुळासकट तोडण्यात आली असल्याचे स्थानिकांनी स्पष्ट केले आहे. विशेषतः खडसे कॉलेजसमोरील वडाचे भव्य झाड मुळासकट तोडले गेल्याची पुष्टी होत आहे. दोन महिन्यांनंतरही संबंधितांवर कोणतीही कारवाई न झाल्याने नागरिकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे चौकशी आणि जबाबदारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

या प्रकरणामुळे मुक्ताईनगरमध्ये पर्यावरणीय संतुलन धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात असून, शासनाने तत्काळ हस्तक्षेप करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांकडून जोर धरत आहे.

 


Protected Content

Play sound