नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात सध्या भीतीचे वातावरण बनले असून लोक सरकारवर टीका करण्यासही घाबरत आहेत. लोकांना सरकारला प्रश्न विचारण्याची मुभा का नाही? असा प्रश्न भारतातील प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना एका कार्यक्रमात थेट विचारला आहे.
या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रेल्वे मंत्री पीयूष गोयल हे उपस्थित होते. यावेळी बजाज यांनी सरकारला प्रश्न विचारण्याची मुभा लोकांना का नाही? लोकांना युपीएच्या सरकारवर टीका करण्याचे स्वातंत्र्य होते. मात्र, सध्याच्या सरकारने भीती आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण केले आहे. युपीए-२च्या कार्यकाळात आम्ही कोणावरही टीका करु शकत होतो. पण आता तशी स्थिती नाही, असे थेट प्रश्न विचराले. यावर उत्तर देताना अमित शाह म्हणाले, देशात कुठल्याही प्रकारच्या भीतीचे वातावरण नाही. कोणालाही घाबरण्याचे कारण नाही. तरीही तुम्ही म्हणत असाल की देशात असे वातावरण आहे तर ही परिस्थिती बदलण्यासाठी आम्हाला काम करावे लागेल. सरकार पारदर्शी पद्धतीने काम करीत आहे. कोणती टीका होत असेल तर त्याला गांभीर्याने घेत आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करीत, असे सांगितले.