साकेगाव, ता. भुसावळ- जितेंद्र पाटील | येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण हे सर्वसाधारण महिलेसाठी निघाल्याने यंदाच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे आता गावात याचबाबत चर्चा रंगली आहे.
साकेगाव ग्रामपंचायतीची निवडणूक तोंडावर आली असून दोन दिवसांपूर्वीच सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. यात यंदा सर्वसाधारण महिला या वर्गवारीचे आरक्षण निघाले आहे. अर्थात, आता कोणत्याही समाजाची महिला ही लोकनियुक्त सरपंचपदाची निवडणूक लढवू शकणार आहे. अर्थातच, यामुळे यंदाची निवडणूक ही अतिशय चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

साकेगाव ग्रामपंचायत सध्या अतिशय नाजूक स्थितीतून जात आहे. एमआयडीसीची थकबाकी न भरल्यामुळे गावात अभूतपुर्व पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तसेच अनेक कामे अपूर्ण असल्यामुळे साकेगावकरांची मोठी कुचंबणा होत आहे. परिणामी, कधी काळी जिल्ह्यात नावाजलेल्या साकेगाव ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत लोकांमध्ये मोठी नाराजी आहे. यातूनच अलीकडेच दोन महिला ग्रामपंचायात सदस्यांनी राजीनामा दिला आहे. या सर्व बाबींचा विचार करता आगामी निवडणुकीतील लढत ही जोरदार होण्याची शक्यता आहे.
साकेगावमध्ये सध्या भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी शरद पवार व राष्ट्रवादी अजित पवार या पक्षांचे मान्यवर पदाधिकारी असून याच्या जोडीला काही अपक्ष उमेदवार देखील उभे राहू शकतात. यामुळे यंदाची निवडणूक ही बहुरंगी होणार असल्याचे स्पष्ट संकेत आताच मिळाले आहेत. यात एका बाजूला अनिल पाटील, संजय पाटील, आनंदा ठाकरे आदींचा भारतीय जनता पक्ष आहे. तर त्यांच्या विरोधात कधी काळी साकेगावच्या राजकारणातील किंगमेकर असणारे शकील पटेल व त्यांचे सहकारी दंड थोपटून तयारीत आहेत. तर तिसरीकडे माजी जि.प. गटनेते तथा अजितदादा पवार गटाचे मान्यवर पदाधिकारी रवींद्र नाना पाटील हे आहेत. या तिन्ही गटांचे तोंड तीन दिशांना असून यांच्यातच तुल्यबळ फाईट होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या संदर्भात लाईव्ह ट्रेंडस न्यूजने चाहूल घेतली असता सर्वच जण सावध असल्याचे दिसून आले. शकील पटेल यांनी आपल्या गटाकडून अनिता धनराज भोई या सरपंचपदाची निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट सांगून टाकले. ते म्हणाले की, साकेगावची सेवा कोण करू शकते हे जनतेला माहित असल्याने आम्हाला साकेगावकर निश्चीत कौल देतील असा ठाम विश्वास आहे. तर धनराज भोई यांनी देखील याला दुजोरा देतांना आपण सर्व ताकदीने निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले. भाजपचे नेते अनिल पाटील, संजय पाटील आणि आनंदा ठाकरे यांनी पक्षश्रेष्ठी जो उमेदवार ठरवतील त्याच्या पाठीशी उभे राहून त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले. तर रवींद्र नाना पाटील यांनी आपण ऐन वेळेस अतिशय सक्षम असा उमेदवार देणार असल्याचे नमूद केले.
याच्या जोडीला काही अपक्ष उमेदवार देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. तर ऐन निवडणुकीच्या धामधुमीत अजून काही चेहरे अचानक समोर येऊ शकतात. म्हणजेच निवडणूक ही बहुरंगी होणार असल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत पाहता सर्वसाधारण महिला आरक्षण निघाल्यामुळे साकेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत जबरदस्त चुरस निर्माण होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. याचमुळे गावात याबाबतच चर्चा रंगली आहे.



