भडगाव प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष निवड व तालुकाध्यक्ष निवडीची बैठक नुकतीच जळगाव येथे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी भडगाव तालुकाध्यक्ष म्हणून अमोल नाना पाटील यांचे नाव घोषित करण्यात आले. मात्र, काल (दि.११) भडगाव शहरात शासकीय विश्रामगृहात भाजपाच्या दुसऱ्या गटाची बैठक घेण्यात आली असून यात चुडामण पाटील यांची तालुकाध्यक्षपदी नाव घोषित करण्यात आले. त्यामुळे खरा भाजपा तालुकाध्यक्ष कोण ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मागील आठवड्यात भडगाव येथे भाजपा तालुकाध्यक्ष निवडीबाबत बैठक झाली होती. यावेळी तालुकाध्यक्ष पदासाठी एकूण १८ जण इच्छुक होते. याबैठकीत शेवटपर्यंत सात ते आठ जणांनी माघार घेतली होती. उर्वरित इच्छुकांची यादी जिल्हास्तरावर पाठविण्यात आली होती. जळगाव येथून तालुकाध्यक्ष जाहीर करण्यात येणार असे सांगण्यात आले. याबाबत काल जळगाव येथे बैठक झाली. यामध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आ.गिरीश महाजन यांच्यासह वरिष्ठ नेते यांच्या समोर भडगाव तालुकाध्यक्ष म्हणून अमोल पाटील यांच्या नावाची घोषणा झाली. तसे पत्र सुध्दा मिळाले. परंतु या घडामोडीनंतर भडगाव तालुका भाजपाच्या डॉ.संजिव पाटील गटाने शासकीय विश्रामगृह येथे (दि.११) रोजी चार वाजता बैठक घेण्यात आली. त्यावेळी चुडामण पाटील यांच्या नावाची घोषणा झाली. यामुळे भडगाव तालुका अध्यक्षपदही संभ्रमात पडले आहे.
जळगाव येथे जळगाव जिल्हा सहाय्यक निवडणुक अधिकारी डॉ. विजय धांडे यांनी घोषित केलेले अमोल पाटील अध्यक्ष की भडगाव येथे झालेल्या मिंटीगमध्ये (दि.८) तारखेच्या नियुक्ती पत्राचा खुलास देत तत्कालीन जिल्हाध्यक्ष डॉ. संजिव पाटील यांनी घोषित केलेले चुडामन पाटील हे अध्यक्ष ? असा संभ्रम भडगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला असून याबाबत पक्षाचे नेते व जिल्हाध्यक्ष काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.