जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । डॉक्टरांच्या पांढऱ्या कोटात नितीमत्ता, करूणा आणि रुग्णांच्या सुरक्षेची मोठी जबाबदारी दडलेली असते. वैद्यकीय व्यवसायातील हीच तत्त्वे आत्मसात करून समाजसेवेची वाटचाल आरंभ करणाऱ्या डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएस प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचा व्हाइट कोट व डीन अॅड्रेस समारंभ सोमवारी उत्साहात साजरा झाला. नव्या शैक्षणिक प्रवासाच्या या महत्त्वपूर्ण क्षणी विद्यार्थ्यांनी जबाबदारीची जाणीव मनोभावे स्वीकारली.

समारंभाच्या सुरुवातीला माजी खासदार व गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते आरोग्य देवता धन्वंतरीचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी गोदावरी फाऊंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा पाटील, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. वैभव पाटील, अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, बायोकेमिस्ट्री विभागप्रमुख डॉ. निलीमा पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांना संबोधित करताना डॉ. पाटील यांनी डॉक्टरांच्या कार्यात नितीमत्ता आणि करूणेचे महत्त्व अधोरेखित केले. डॉक्टर हा रुग्णाच्या आयुष्यात देवासमान असतो आणि त्यामुळे त्याचा प्रत्येक निर्णय रुग्णांच्या सुरक्षिततेशी निगडित असतो, असे त्यांनी सांगितले.

डॉ. पाटील म्हणाले की, डॉक्टरांचे काम फक्त उपचार देणे नसून समाजाला आश्वासक आरोग्य सेवा देण्याचे मोठे दायित्वही आहे. विद्यार्थ्यांनी या क्षेत्रातील अंतर्गत मूल्यांकन आणि अभ्यास अत्यंत गांभीर्याने घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली. वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवासात संस्थेचे प्रतिनिधी असल्याने त्यांच्या अनुकरणीय वर्तनावर संस्थेची ओळख अवलंबून असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून, “देवानंतर सर्वाधिक मान डॉक्टरांना मिळतो,” असे सांगितले. वैद्यकीय क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी परिश्रम, त्याग आणि आत्मविश्वासाची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. गोदावरी फाऊंडेशन हा एक भक्कम वटवृक्ष असून या संस्थेतून घडणारे विद्यार्थी समाजासाठी प्रेरणादायी ठरतात, असेही ते म्हणाले.
महाविद्यालयाचे रजिस्ट्रार प्रमोद भिरूड यांनी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाल्यानंतरच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून दिली. पालकांच्या त्यागातून निर्माण झालेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढील पाच वर्षे विद्यार्थ्यांनी मनापासून मेहनत घ्यावी, असे त्यांनी सांगितले. वैद्यकीय शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे व्यासपीठ असून त्यातूनच ते भविष्यात तज्ज्ञ डॉक्टर बनत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
समारंभात प्रथम वर्षातील सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते व्हाइट कोट परिधान करून गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या वतीने चिन्मया वझे आणि पियुष बिसेन यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुयश देशपांडे, मृण्मयी टीबे, साहील जोशी आणि मानसी राणे यांनी केले, तर आभार साहील आणि मानसी यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विभागांचे शिक्षक व डॉक्टर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समारंभाने नव्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वैद्यकीय सेवेत योगदान देण्याची प्रेरणा निर्माण केली असून त्यांच्या तर्फे ज्ञान, सेवा व जबाबदारीची नवी वाटचाल सुरू झाली आहे.



