चाळीसगाव, प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे उमेदवार हे महालात राहणारे आहेत, राजेशाही मुकुट आपल्या डोक्यावर कायमच स्वार असल्याचा अविर्भाव त्यांच्यात असून ही बाब चाळीसगाव शहरातील जनतेला देखील खटकते. मागच्या पाच वर्षात विरोधी बाकावर बसूनही त्यांनी आपल्या डोक्यावरचा राजेशाही मुकुट खाली उतरविला नाही असा आरोप मंगेश चव्हाण यांनी केला. करमुड, कुंझर, राजमाने आदी ग्रामीण भागातील प्रचार दौऱ्यात ते मतदारांशी संवाद साधत होते.
२०१४ च्या निवडणुकीत आजचे राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाले. त्यानंतर पाच वर्षे ते अज्ञातवासात होते. ते लोकांच्या संपर्कात नव्हते. आम्ही तुमच्याकडे येणार नाही. तुम्हीच आमच्याकडे या, तुम्हीच आमच्या गडाचे उंबरठे झिझवा, असा त्यांचा स्वभाव हा जनतेला चांगला माहित असून याचे उत्तर आता विधानसभेच्या निकालात आमच्या बाजूने दिसून येईल असा विश्वास मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केला. मी गेल्या १० वर्षांपासून समाजकारण – राजकारणात सक्रिय आहे. २०१२ मध्ये पंचायत समिती निवडणूक लढविणे असो की २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सक्रिय सहभागी होतो. आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेने दुष्काळात २ महीने चारा छावणी सुरू केली. सर्व शहरात सीसीटीव्ही कॅमेरे, अनेक ठिकाणचे नदीपात्र खोलीकरण, वलठाण धरण गाळ काढणे, विद्यार्थ्यांना सायन्स लॅब्स, समाजकारणाच्या माध्यमातून भाविकांना पंढरीची वारी घडविली. ग्रामीण भागात शवपेटी, शहरात ११ वाचनालये अशी अनेक सामाजिक कामे केली. धनसंपत्ती वगैरे असे आरोप त्यांच्यावर लावण्यात येतो परंतु, वारकरी संस्कारातून दान देत असतो असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. तुम्ही नागरिकांसाठी स्वतःच्या खिशातला पैसा खर्च करत नाही तर तुम्ही काय जनतेचा विकास करणार, असा हल्ला मंगेश चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारावर चढविला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी भाजपाला मतदार मतदान करतील. चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात मागच्या पाच वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, खासदार उन्मेष पाटील यांच्या दूरदृष्टीने भरीव विकास झालाय. या सर्व बाबी पाहता मी नक्की ५० हजाराच्या मतांनी निवडून येईल असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.