मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | गायीला मिठी मारायला सांगतात, मग उधळलेल्या बिग बुलची चौकशी कधी होणार ? असा सवाल आज शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने भाजपला विचारला आहे.
दैनिक सामनामधून गायीला मिठी मारण्याच्या फर्मानावरून जोरदार टिकास्त्र सोडण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, अदानी घोटाळ्यावर पंतप्रधानांकडून स्पष्टीकरण हवे होते. पण मोदी सरकारने पुन्हा एकदा धर्माच्या गुंगीचे औषध देऊन गप्प केले आहे. मोदी संसदेत अदानीवर बोलले नाही. पण त्यांचे सरकार गायीवर बोलले. अदानी शेअर बाजारातील बिग बुल आहेत. मोदी त्या बिग बुलला मिठी मारून बसले आहेत. ते मिठी जराही सैल करायला तयार नाहीत. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी गोमांस खाणार्यांनाही संघाचे दरवाजे उघडे असल्याचं म्हटलं आहे. गोमांस खार्यांना संघाचे दरवाजे उघडे असतील तर मग गोमांस खाण्यावरून हत्या का घडवल्या? याचे उत्तर देशाला मिळायला हवे, असे यात नमूद केले आहे.
या अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, गायीला मिठी मारल्याने अदानींसह सर्व महाघोटाळ्यांचे पाप धुवून निघणार आहे काय? गाय हा उपयुक्त पशू आहे. असं वीर सावरकर म्हणायचे. सावरकरांचे हे विचार भाजप आणि संघ परिवाला मान्य आहे काय? गायीला मिठी मारल्याने भावनिक उन्नती होते, असं मानलं तर हा प्रकार गायीलाही मान्य व्हायला हवा ना? व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी चारा-पाण्याशिवाय हंबरणार्या गाईला मिठी मारल्याने उधळलेल्या बिग बुलच्या गुन्ह्यांची चौकशी मोदी सरकार करणार आहे काय? असा सवालही या अग्रलेखात विचारण्यात आला आहे.