जळगाव, प्रतिनिधी | भाजपचे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना आता पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आल्याचे स्पष्ट संकेत आज (दि.२) सायंकाळी जिल्हा पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांच्या बोलण्यातून मिळाले.
पत्रकारांनी मुक्ताईनगरबद्दल विचारलेल्या प्रश्नावर ना. महाजन यांनी त्याबद्दल मुख्यमंत्री व पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील असे उत्तर दिले असले तरी रोहिणी ताईंना तिकीट मिळण्याची चर्चा आहे, या पुढच्याच प्रश्नाला त्यांनी कुणाचेही नाव त्या मतदार संघासाठी फायनल होवू शकते, अगदी नाथाभाऊ सुचवतील त्या कुणाचेही नाव असू शकते, असे स्पष्ट केले. त्यामुळे यावेळी नाथाभाऊंना तिकीट मिळणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
त्याचवेळी ना. महाजन यांनी नाथाभाऊंना तिकीट न मिळाल्यास लेवा पाटीदार समाज नाराज होणार असल्याचा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, प्रत्येक निर्णयाने कुणीना कुणी नाराज होतच असतो. उद्या मला तिकीट मिळाले नाही तर माझा समाजही नाराज होईल, कुणाच्याही समाजाला त्यामुळे वाईट वाटेल, असे ते म्हणाले. त्यामुळे लेवा समाजाच्या नाराजीचाही विचार सरकारने मनात ठेवल्याचे स्पष्ट होते.