नवी दिल्ली वृत्तसंस्था । स्वातंत्र्यानंतर ज्यांनी गरिबांची बँकेत खाती उघडली नाहीत, ते गरिबांच्या खात्यात पैसे काय जमा करतील? असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना नाव न घेता लगावला. उत्तर प्रदेशातील मेरठ येथे पहिल्या निवडणूक प्रचार सभेला संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस यांच्या न्याय योजनेवर टीकास्त्र सोडले. ज्यावेळी गोरगरिबांची बँकेत खाती उघडण्यास सुरुवात केली, त्यावेळी हेच नेते मंडळी हे देशात बँका नाहीत, नुसती खाती उघडून काय करणार? अशी टीका करत असल्याचा टोला मोदींनी लगावला.
मी जेव्हा ८-१० वर्षाचा होतो, तेव्हा सरकार गरिबी हटवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं ऐकत होतो. जेव्हा मी २०-२२ वर्षाचा झालो तेव्हा इंदिरा गांधींनी गरिबी हटावचा नारा दिल्याचं ऐकलं होतं. आता काँग्रेसच्या नामदारांनीही तिच घोषणा केलीय. काँग्रेसच्या प्रत्येक पिढीत गरिबी हटावची घोषणा होते, पण गरिबी मात्र काही हटवली जात नाही, अशी खरमरीत टीकाही त्यांनी केली.