भाविकांच्या जल्लोषात जळगावात ग्राम फेरी मिरवणूक उत्साहात
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील श्रीकृष्ण कॉलनीतील श्री सिद्धेश्वर महादेव मंदिरातर्फे जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा दि. २९ फेब्रुवारी ते ९ मार्च २०२४ दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त गुरुवारी दि. २९ रोजी संध्याकाळी ५ वाजता परिसरात ग्राम फेरी मिरवणूक ढोलताशांच्या गजरात काढण्यात आली. यावेळी भाविकांनी महादेवाचा जयघोष करीत मोठा उत्साह दाखविला.
ग्रामप्रदक्षिणा फेरीला सुरुवातीला माजी महापौर सीमा भोळे यांनी देवतांचे पूजन केले. त्यानंतर भाविकांनी महादेवासह देवतांचा जयघोष केला. यानंतर मिरवणुकीला प्रारंभ झाला. मिरवणुकीत बग्गीत श्री महादेव, श्री गणेश आणि नंदीची प्रतिमा ठेवण्यात आली होती. तसेच महिला-पुरुषांसह लहान मुले पारंपरिक वेशभूषेत मिरवणुकीत सहभागी झाली होती. ढोलताशांच्या गजरात भक्तिगीतांवर भाविकांनी ताल धरला. मिरवणुकीत महिला भाविकांनी फेटे घातले होते. तसेच भाविकांनी फुगड्या खेळून मिरवणुकीत रंगत आणली.
ग्राम् फेरी मिरवणूक हि सिद्धेश्वर मंदिर, कृषी कॉलनीतील नवसाचा गणपती मंदिर, मारोती मंदिर, श्रीकृष्ण मंदिर मार्गे पार्ट सिद्धेश्वर मंदिरात पूर्ण झाली.
आजपासून जीर्णोद्धाराला व श्री रामायण कथेला प्रारंभ
श्री सिद्धेश्वर महादेव मंदिराचा दि. १ ते ३ मार्च दरम्यान जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठाकरीता पूजन सकाळी ७ वाजेपासून केले जाणार आहे. यात गणेश पूजन, मातृका पूजन, देहशुद्धी, पंचांगकर्म, देवता न्यास, देवता उत्थापन आदी विधी केले जाणार आहे. तसेच, दि. १ मार्चपासून ७ दिवस मलकापूर तालुक्यातील कुंड येथील ह.भ.प. प्रभाकर महाराज हे श्रीमदनोस्वामी तुलसीदासजी कृत श्री रामायण कथा दुपारी १ वाजेपासून भाविकांना सांगणार आहे. त्यानंतर संध्याकाळी ५ वाजता हरिपाठ होणार आहे. भाविकांनी या कथाश्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.