जळगाव प्रतिनिधी । युती व्हावी ही आपली इच्छा आहे, तथापि, कुस्तीसाठी आम्ही तयार असून असे झाल्यास विजय आमचाच असल्याचा दावा आज जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला.
शिवजयंती महोत्सव समितीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ना. गिरीश महाजन यांनी राजकीय भाष्य केले. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी काही दिवसांपूर्वी युती व्हावी, अशी आमची इच्छा आहे, मात्र वेळ पडल्यास आम्ही लंगोट बांधून तयार राहू, असे वक्तव्य केले होते, यासंदर्भात ना. महाजन यांना आज विचारणा केली असता, गुलाबराव हे मोठे पहेलवान आहेत, ते नेहमी खिशात लंगोट घेऊन फिरतात. मात्र युती होणे न होणे हे माझ्या किंवा त्यांच्या हातात नाही, वरिष्ठ पातळीवर हे निर्णय होतील. युती व्हावी, हीच आमची इच्छा आहे, युती होईल, याबाबत आम्ही सकरात्मक आहोत. आम्ही लंगोट शिवलेला नाही, मात्र वेळ पडल्यास आमच्याकडे कापड तयार आहे, लंगोट शिवायला अधिक वेळ लागणार नाही, आम्हीही तयार राहू व कुस्ती झाल्यास विजय आमचाच होईल हे मात्र नक्की, असे वक्तव्य ना. महाजन यांनी आज पत्रकारांशी बोलताना केले.