पुणे, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | राष्ट्रवादी पक्षात आम्ही सर्वांची काळजी नेहमी घेत असतो, आणि आम्ही कुणाची काळजी घ्यावी काय निर्णय घ्यावा याविषयी इतरांनी चिंता करू नये, अशी टीका उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी केली.
एमआयएमचे असउद्दीन ओवेसी यांनी त्यांच्या एका कार्यक्रमात खा. संजय राऊत यांच्यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पंतप्रधानांकडे चर्चा करू शकतात, परंतु राष्ट्रवादीचे मंत्री मलिक यांच्यावर झालेल्या आरोपांच्या बाबतीत मात्र पवार यांनी दुर्लक्ष केले असल्याने ते तुरुंगात असल्याची टीका केली होती. या टीकेवर बारामती दौऱ्यावर असलेले ना. पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले.
पुढे ते म्हणाले कि, पुण्यात करोनाच्या नव्या वेरियंटचे सात रुग्ण आढळले असून नव्या वेरियंटसंदर्भात आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे यांना माहिती घेण्यास सांगितले आहे. तसेच मुंबईला गेल्यानंतर यावर सविस्तरपणे चर्चा करून आवश्यकतेनुसार सर्वसामान्य जनतेला त्यासंदर्भात काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन आणि सूचना दिल्या जातील.
याशिवाय या खरिप हंगामासाठी लागणारे बी-बियाणे, खतांसदर्भात खरिपपूर्व आढावा बैठक घेण्यात आली आहे. शेतकऱ्यांना बी-बियाणे, खतांची किंवा कसल्याप्रकारची टंचाई जाणवणार नाही, अशी दक्षता राज्य सरकारकडून घेतली जात आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कृषी मंत्री दादा भुसे यांच्यासमवेत चर्चा झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.
विरोधकांकडून मुंबई महापालिकेत घोटाळा झाल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, विरोधकांकडून नेहमीच अशा प्रकारचे विविध आरोप केले जातात. ज्यात काही तथ्य नाही, अशा प्रकारचे कोणीही आरोप करतात, ज्यात तथ्य असेल तर त्याची नेहमीच दखल घेतली जाते, असेही ना. पवार म्हणाले.