मुंबई (वृत्तसंस्था) निवडणूक होत असताना पारदर्शकता बाळगली गेलीच पाहिजे. अशी आमची प्रमुख मागणी आहे. त्याचमुळे ईव्हीएमला आमचा विरोध आहे. विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर निवडणूक घेतली गेली पाहिजे, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली. ‘ईव्हीएम’ हद्दपार करून पुन्हा मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी मैदानात उतरलेले महाराष्ट्रातील सर्व विरोधी पक्षांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
या पत्रकार परिषदेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, छगन भुजबळ, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, शेकापचे जयंत पाटील, लोकभारतीचे कपिल पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सगळ्यांच्या वतीने भूमिका मांडली आणि त्यामध्ये त्यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली. विधानसभा निवडणुकीत इव्हीएम नको बॅलेट पेपर आणा अशी मागणी विरोधकांनी एकमुखाने केली आहे. ईव्हीएम विरोधात २१ ऑगस्ट रोजी आम्ही मोर्चा काढणार आहोत. ही जनभावना आहे त्यामुळे या मोर्चात एकाही पक्षाचा झेंडा नसेल. लोकांचे म्हणणे काय आहे? ते आम्ही मांडणार आहोत असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
ईडीच्या चौकशीला घाबरत नाही,असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. ईडीच्या चौकशीची धमकी देऊन वृत्तसंस्थांच्या मालकांवरही दबाव आणला जातोय. माझ्या ईडीच्या चौकशीच्या केवळ बातम्या वाचल्या. जनता निवडून देईल हा विश्वास आहे मग मुख्यमंत्री मशिनला कवटाळून का बसलेत? असा सवाल देखील राज ठाकरेंनी विचारला आहे. तर २० लाख मशिन्स गायब असून त्या कुठे गेल्या याचे उत्तर द्यावे, असे प्रकाश रेड्डी यांनी म्हटले. यावेळी अन्य अनेक मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले आहे.