मुंबई, वृत्तसंस्था | शिवसेना नेते संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले असून आम्ही ३० तास काय ३० मिनिटांतही बहुमत सिद्ध करु शकतो असा दावा केला आहे. महाराष्ट्रामधील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला असून उद्या म्हणजेच २७ नोव्हेंबर रोजी बहुमत चाचणी घेण्याचा आदेश दिला आहे. संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना सत्याचा विजय झाला असल्याचे म्हटले आहे.
“या देशात न्यायव्यवस्था सर्वोच्च आहे. न्यायालयात आम्ही जे बोलत होतो, ते सत्य होते. न्यायालयाच्या निकालाने ते खरे ठरले आहे. सत्याचा विजय झाला आहे,” असे राऊत यांनी म्हटले आहे. “आमचे सगळे मुद्दे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले आहेत. या देशात अजूनही सत्य पराभूत होत नाही. आम्ही ३० तास काय ३० मिनिटांतही बहुमत सिद्ध करु शकतो,” असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रामधील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. राज्यामधील घोडेबाजार थांबवण्यासाठी लवकरात लवकर बहुमत चाचणी घेणे गरजेचे असल्याचे सांगत न्यायलयाने उद्या म्हणजेच २७ नोव्हेंबर रोजी बहुमत चाचणी घेण्याचा आदेश दिला आहे. उद्या सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आमदारांचा शपथविधी पूर्ण करण्यात यावा, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. विश्वासदर्शक ठरावाचे लाईव्ह चित्रीकरण करण्यात यावे, असेही न्यायालयाने सांगितले आहे.
“लोकशाही मूल्यांचे रक्षण होणे आवश्यक आहे. लोकांना चांगले सरकार मिळणे हा मुलभूत अधिकार आहे. तसेच घोडेबाजार रोखण्यासाठी न्यायालयाला काही आदेश देणे गरजेचे आहे. त्यामुळे कोणतेही गुप्त मतदान न घेता उद्या (२७ नोव्हेंबर) सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत बहुमत चाचणी घेण्याचा आदेश आम्ही देत आहोत,” असे न्यायाधिशांनी स्पष्ट केले आहे.