मुंबई प्रतिनिधी । ‘ही विधानसभा निवडणूक नेत्यांच्या हातात नसून जनतेच्या हातात आहे. काळजी करू नका, आज आपल्यासोबत अब्दुल सत्तार आहेत, म्हणजे आपल्याकडेच सत्ता येणार, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे. शिवसेनेचे उमेदवार अब्दुल सत्तार यांच्या प्रचारार्थ आज सकाळी सिल्लोडमध्ये झालेल्या सभेत ते बोलत होते.
तुम्हाला सर्वांना मी नमस्कार करतो, असं म्हणत त्यांनी सभेतील भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी शिवसेनेने गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला. शेवटी वाघ हा एकटा लढून जिंकत असतो म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शहरातील बंडखोरांना टोला लगावला आहे. आपल्यासोबत अब्दुल सत्तार आहेत म्हणजे आपल्याकडेच सत्ता येणार आहे, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे.
अब्दुल सत्तार यांच्यामार्फत शिवसेना पहिल्यांदाच सिल्लोड मतदारसंघ लढवत आहे. अब्दुल सत्तार हे सिल्लोडचे काँग्रेसच्या तिकीटावर झालेले विद्यमान आमदार आहेत. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या वेळी अब्दुल सत्तार यांनी बंडखोरी करत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. यानंतर विधानसभेसाठी ते भाजप पक्षात येऊ इच्छित होते. यासाठी मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेवेळी सत्तार यांनी मोठे शक्तीप्रदर्शन केले होते. मात्र भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी विरोध केल्यामुळे अब्दुल सत्तारांनी अखेर शिवबंधन बांधले. 2014 पर्यंत सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघ भाजपकडे होता. मात्र यावेळी तो शिवसेनेला सोडण्यात आला आहे.