मुंबई (वृत्तसंस्था) हे अराजकतेचे लक्षण आहे आणि हे वाढतच जाणार आहे. कारण आपल्याला यातून बाहेर पडता येणे कठीण आहे. आता आपली वाटचाल अतिशय हिंसक पद्धतीने सुरु आहे, असे मला वाटते. आपल्या देशात असे कधी नव्हते. दुर्दैवाने आपण पाकिस्तान होत चाललो आहोत, अशा शब्दात ज्ञानपीठ विजेते लेखक आणि ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी देशात सुरु असलेल्या नागरिकत्व कायद्याविरोधात सुरु असलेली आंदोलनावर भाष्य केले आहे.
भालचंद्र नेमाडे म्हणाले, नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) हा खूप तज्ञ लोकांचा उद्योग आहे. राजकारणी लोकांचा हा विषय नाही. सर्वसामान्य माणसाने आपले आयुष्य नीट काढावे इतकीच आपली अपेक्षा असते. हा घाणेरड्या लोकांचा उद्योग असतो. चांगल्या लोकांना यात घालू नये असे मला वाटते. खरं म्हणजे हा विषय इतका विद्यार्थ्यांपर्यंत जाणे हेही चूकीचे आहे. हे ठराविक तज्ञ लोकांनी सोडवावे असे प्रश्न आहेत. दुर्दैवाने लोक रस्त्यावर यायला लागली आहेत. आपल्या देशात गुप्तहेर, दहशतवादी, त्या देशातून हाकलून दिलेले गरिब-अनाथ आणि हा देश आवडतो म्हणून येणारे असे शंभर प्रकारचे लोक येतात. त्या सर्वांना एकाच मापाने मोजणं बरोबर नाही. ज्यांना यायचे त्यांना येऊ द्यावे. सरकारची इतकी मोठी यंत्रणा आहे. त्यावर इतका खर्च होतो. त्यामुळे त्यातील दहशतवादी कोण आहेत हे शोधणे सरकारचे काम आहे. मात्र, कोणत्याही गरिब नागरिकाला या देशाचे नागरिक होऊ नको म्हणणे योग्य नाही, असेही भालचंद्र नेमाडे यांनी नमूद केले आहे.