नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तारही पार पडला. मात्र, मंत्रिमंडळातून अनेक दिग्गज नेत्यांना डावलण्यात आलं. त्यामुळे महायुतीमधील अनेक नेते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनाही मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं. त्यामुळे त्यांनी जाहीर नाराजी बोलून दाखवली. जहां नहीं चैना, वहां नहीं रहना, असं सूचक विधानही छगन भुजबळ यांनी केले होते.
त्यानंतर आज छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत खदखद व्यक्त केली. आता भुजबळांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते त्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, भुजबळांच्या नाराजीबाबत बोलताना भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन यांनी मोठं विधान केलं आहे. “छगन भुजबळांची नाराजी आम्हाला परवडणारी नाही”, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता महायुतीमधील काही नेते भुजबळांची भेट घेतात का? तसेच त्यांची नाराजी दूर करण्यात येणार का? हे आता पुढच्या काही दिवसांत पाहायला मिळेल.
“माझे आणि छगन भुजबळ यांचे कौटुंबिक संबंध आहेत. भुजबळ हे एक मोठे नेते आहेत. राज्यातील ओबीसीचा मोठा चेहरा म्हणजे भुजबळ आहेत. ते महायुतीत वरिष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांची नाराजी आम्हाला परवडणारी नाही ही गोष्ट खरी आहे. त्यांच्याशी काल आणि परवा देखील मी बोललो. आता दोन दिवसांनी मी पुन्हा नाशिकला जाणार आहे. तेव्हा मी त्यांची भेट घेणार आहे. छगन भुजबळ हे महायुती सोडणार नाहीत. त्यांनी महायुती सोडणे हे आम्हालाही परवडणारे नाही. कारण राज्यातील ओबीसींचे ते मोठे नेते आहेत हे सर्वांना मान्य करावं लागेल”, असे गिरीश महाजन यांनी म्हटले.