वाळू तस्करांचा महसूल पथकावर हल्ला : तलाठी गंभीर जखमी

धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील चांदसर बुद्रुक येथील गिरणा नदी पात्रात कारवाईसाठी गेलेल्या महसूल खात्याच्या पथकावर वाळू तस्करांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना रात्री उशिरा घडली आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, सध्या अवैध वाळूचा धंदा जोरात सुरु असून याला अटकाव करण्याचा महसूल खाते प्रयत्न करत आहे. या अनुषंगाने काल रात्री धरणगाव येथील तहसीलदारांनी चांदसर येथील गिरणा नदी पात्रात कारवाई करण्यासाठी पथक तयार केले. हे पथक नदीच्या पात्रात उतरल्यावर तिथे असलेल्या सुमारे 15 ते 16 वाळू तस्करांनी या पथकावर हल्ला सुरू केला.

यात तलाठी दत्तात्रय पाटील यांना जोरदार मारहाण करण्यात आली. त्यांच्या पायावर फावड्याच्या दांड्याने मारहाण करण्यात आल्यामुळे ते जखमी झाले. दरम्यान वाळू तस्करांनी मारहाण सुरू केल्यामुळे पथकातील इतरांनी घटनास्थळावरून फळ काढून आपला जीव वाचवला. तर दत्तात्रय पाटील हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जळगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गिरणा नदीपात्रातून वाळूचा अंदाधुंद उपसा होत असून तस्कर हे कुणालाही जुमानत नसल्याचे दिसून आले आहे. यातच आता थेट तलाठ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा जखमी तलाठी दत्तात्रय पाटील यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत असून या प्रकरणाच्या संदर्भात पाळधी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.

Protected Content