जळगाव/धरणगाव (प्रतिनिधी)। मतदार संघात विकासाच्या कामाला आपण सर्वात जास्त महत्त्व देतो, टीका करणे आणि न केलेल्या कामाचे श्रेय घेणे हे माझ्या स्वभावात आणि तत्वात नाही. जे काम केले ते जनतेसमोर आहे. गावाच्या विकासासाठी रस्ते व पुलांचा विकास महत्वाचा असतो, त्यासाठी मतदारसंघात कोट्यवधींचा निधी उपलब्ध केला असून कामे सुरू आहेत. यापूर्वी काही लोकांमुळे गावात पाण्याची योजना अयशस्वी झाली असली तरी शासन दरबारी नव्याने पाठपुरावा करून झुरखेडा व निमखेडा गावांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणार असल्याचे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री तथा परभणी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज येथे केले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आम्ही युती धर्म पाळणार असून जनता यापुढेही भगव्या लाटे सोबतच राहील, असा विश्वास ना. गुलाबराव पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. धरणगाव तालुक्यातील झुरखेडा येथे पुलाचे व विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. तालुक्यातील पाळधी-पथराड-झुरखेडा-दहीदुल्ला रस्त्यावरील झुरखेडा गावाजवळ असलेल्या पुलाचे तसेच गावांतर्गत रस्त्यावर पेव्हिंग ब्लॉकच्या कामाचे भूमिपूजन सहकार राज्यमंत्री तथा शिवसेनेचे उपनेते ना. गुलाबराव पाटील यांचे हस्ते करण्यात आले. सदर पुलाच्या कामासाठी एक कोटी २८ लक्ष रुपये इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे. सदर पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांनी दिल्या आहेत.निमखेडा येथे आठ लक्ष निधी सार्वजनिक सभागृहासाठी मंजूर असून तीन लक्ष निधी पेव्हिंग ब्लॉकसाठी तर दोन्ही गावात सोलर पथदिवेही मंजूर असल्याचे ना. पाटील यांनी सांगितले.
झुरखेडा पुलामुळे दळणवळण सोयीचे होऊन पावसाळ्यात ग्रामस्थ व शेतकऱ्यांची वाहतूक कोंडी दूर होणार असून मुक्या जनावरांचा त्रास नाहीसा होणार आहे. सदर पुलामुळे पाळधी, पथराड, दहिदुल्ला, निमखेडा अशी अनेक गाव जोडली जाणार असल्याने १०-१२ किमीचा फेरा वाचणार आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी ना. गुलाबराव पाटील यांचे कामाविषयी समाधान व्यक्त केले आहे. कार्यक्रमाप्रसंगी झुरखेडा व परिसरातील सरपंच / पदाधिकारी व वि.का.सोसायटी पदाधिकारी तसेच ग्रामस्थांमार्फत ना.गुलाबराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
दूरदृष्टी असलेला नेता गुलाबभाऊ – वाघ
मतदारसंघात राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी विकास कामांच्या माध्यमातून शेतकरी व नागरिकांचे हित जोपासले आहे. गुलाबभाऊंनी पक्षात जीवाला जीव देणारे कार्यकर्ते घडविले असून “विकासाची दृष्टी असलेला नेता म्हणजे गुलाबभाऊ पाटील” असल्याचे मत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी व्यक्त केले. विकासाची जाण असलेले व शेतकरी कैवारी ना. गुलाबराव पाटील यांच्या पाठीशी राहण्याचे आवाहन विभागप्रमुख सुधाकर पाटील, चांदसर सरपंच सचिन पवार, शिवसेनेचे तालुका प्रमुख गजानन पाटील यांनी ग्रामस्थांना आवाहन केले.
यांची होती उपस्थिती
यावेळी व्यासपीठावर तालुका प्रमुख गजानन पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, सभापती अनिल पाटील, उपतालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे, नगरसेवक भागवत चौधरी, पं.स.सदस्य प्रेमराज पाटील, डी.ओ.पाटील, निमखेडा सरपंच दगडू पाटील, उपसरपंच नवल पाटील, ग्रामसेवक वासुदेव मारवडकर, ग्राम सदस्य, अनिल गोलाईत, पुरुषोत्तम पाटील, जीवन पाटील, बी.एम. पाटील, मंगल सोनवणे, रवींद्र दगा पाटील, झुरखेडा सरपंच लक्ष्मीबाई मोरे, जेष्ठ मार्गदर्शक दगा आण्णा पाटील, ज्ञानेश्वर पाटील, संतोष चौधरी, ग्रामसेवक महेश सोनवणे सा.बा.चे उप अभियंता महेश ठाकूर, शाखा अभियंता बी.एस. माळी, ठेकेदार मोहन महाजन यांच्यासह झुरखेडा व निमखेडा परिसरातील सरपंच, ग्रा.पं.सदस्य, वि.का.सोसायटीचे संचालक, शिवसेना पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पं.स.सदस्य मुकुंद ननवरे यांनी केले तर आभार जि.प. सदस्य प्रताप पाटील यांनी मानले.