अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । निम्न तापी प्रकल्पातील पाडळसरे धरणात येत्या दोन वर्षांत पाणी अडवले जाईल, असे नियोजन असून बांधकामाच्या कामाला वेग देण्यात आला आहे. पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेत तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता ज. द. बोरकर यांनी ही माहिती दिली.
जळगाव येथे झालेल्या बैठकीत त्यांनी धरणाच्या गेटसाठी आवश्यक टाय प्लेट्स पोहोचल्या असून, गर्डर बसविण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. यंदाच्या वर्षी उपलब्ध निधी जूनपर्यंत खर्च करण्याचे नियोजन असून पुढील वर्षी निधी प्राप्त झाल्यास दोन वर्षांत धरणाची गेट्स पूर्णत्वास येतील आणि पाणीसाठा दिसू लागेल.
पाडळसरे धरण जनआंदोलन समिती सातत्याने शासन स्तरावर पाठपुरावा करत आहे. या पार्श्वभूमीवर समितीने मुख्य अभियंता बोरकर यांची भेट घेतली. बैठकीत धरणाच्या कामाच्या प्रगतीसह निधीबाबत प्रश्न विचारण्यात आले. अभियंता बोरकर यांनी धरणाच्या बांधकामासोबत उपसा सिंचन योजना, पाईपलाईन आणि पंपिंग स्टेशनचे काम देखील समांतर सुरू असल्याची माहिती दिली.
यावेळी समितीचे प्रमुख सुभाष चौधरी, हेमंत भांडारकर, अमळनेर अर्बन बँकेचे व्हॉईस चेअरमन रणजित शिंदे आणि सुनिल पाटील यांनी शासनाकडून प्राप्त निधी धरणाच्या कामावरच खर्च करावा आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत या धरणाचा तातडीने समावेश करावा, अशी मागणी केली. तसेच भविष्यात मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता असल्याने या योजनेत धरणाचा समावेश करण्यासाठी राज्यस्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचेही सांगण्यात आले. समितीने आवश्यक असल्यास मोठ्या आंदोलनाची तयारी ठेवली असल्याचे स्पष्ट केले.
मुख्य अभियंता बोरकर यांचे या प्रकल्पासाठी गेल्या तीन वर्षांपासून केलेल्या उत्कृष्ट तांत्रिक कार्याबद्दल समितीतर्फे सत्कार करण्यात आला.