जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जिल्ह्यात यावर्षी जून महिन्यात पाणीटंचाई निवारणासाठी ग्रामीण भागात ९ गावांसाठी ८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
गेल्या दोन वर्षापासून जिल्हा टँकर मुक्त होता. यावर्षी सरासरीपेक्षा सव्वा ते दीडपट पर्जन्यमान झाले आहे. परंतु यावर्षी गेल्या तीन चार महिन्यापासून उन्हाळ्यातील तापमान सरासरी ४२ ते ४६ अंशादरम्यान आहे, जास्त तापमानामुळे प्रकल्प तसेच ग्रामीण भागातील पाणीपुरवठा करणारे विहिरी, जलस्त्रोतांमधील पाणीसाठ्याचे बाष्पीभवन जास्त प्रमाणात होत असल्याने मोठा परीणाम झाला आहे.
जून महिन्यात सर्वसाधारण पणे ८ जून पर्यंत पावसाचे आगमन होते, यावर्षी अजूनही पावसाची चिन्हे नाहीत, त्यामुळे पाऊस वेळेवर न आल्यास जून च्या मध्यापर्यंत टँकरमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याचेही दिसून येत आहे.
या तालुक्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा
भुसावळ तालुक्यात कंडारी, महादेव माळ, चाळीसगाव- पिंपळगाव, हातगाव, वाघळी, भडगाव- तळबंद तांडा, वसंतवाडी आणि पारोळा तालुक्यात खेडीढोक, हनुमंतखेडे या ९ गावांसाठी ८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.