मुक्ताईनगर (प्रतिनिधी) येथील नगरपंचायतीच्या नियोजन शून्य कारभारामुळे शहर वासीयांवर पाणीटंचाईच्या गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. पाणीटंचाईच्या विरुद्ध शिवसेना सोमवारी हजारो महिलांच्या उपस्थितीत नगरपंचायतवर मोर्चा काढणार आहे. या संदर्भातील निवेदन जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच मुख्याधिकारी शाम गोसावी यांना देण्यात आले.
शिवसेनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यातील नगरपालिका व ग्रामपंचायतींना तात्काळ बैठकी घेऊन याबाबत नियोजन करण्याचे आदेश दिले होते. मात्र, मुक्ताईनगर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांनी पाणीटंचाई सारख्या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करत कोणतेही नियोजन केले नाही. तसेच पाण्याचे टँकर संदर्भात प्रस्ताव देखील शासनाकडे सादर केला नाही. यामुळे मुक्ताईनगरकरांवर प्रचंड पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले असून सात ते आठ दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. यामुळे शहरवासीयात प्रचंड संतापाची लाट निर्माण झाली आहे. त्यामुळे पालिकेने झोपेचे सोंग घेणे बंद करीत नागरिकांना तात्काळ पिण्याचे पाणी पूरवावे. शिवसेनेने नियमित पाणीपुरवठ्या संदर्भात वारंवार मागणी केली होती. मात्र, केवळ कागदाचा खेळ करणारे मुख्याधिकारी यांनी शासनाकडे तसा कोणताही प्रस्ताव सादर न केल्यामुळे शासनाकडून मिळणारे मोठे टँकर आजतागायत मुक्ताईनगरला प्राप्त झालेले नाहीत. नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. ही परिस्थिती तात्काळ दूर करण्यात यावी, यासाठी शिवसेनेतर्फे सोमवार दिनांक 24 जून रोजी सकाळी 11 वाजता पालिकेवर प्रचंड मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदन देतेवेळी तालुकाप्रमुख छोटू भोई, तालुका संघटक प्रवीण चौधरी, शहर संघटक वसंत भलभले , शहर प्रमुख गणेश टोंगे, नगरपंचायत गटनेता राजेंद्र हिवराळे, नगरसेवक संतोष मराठे, युवासेना उपजिल्हाधिकारी पवन सोनवणे, बाळा भालशंकर, सचिन पाटील, संतोष माळी, पप्पू मराठे, सचिन भोई ,मनोज मराठे, माजी उपसरपंच जाफर अली, हारुण मिस्तरी, जहीर शेख यांच्यासह असंख्य पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.