जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | कोरोना महामारीत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोना बाधित रुग्णाची सेवा करणाऱ्या कंत्राटी कामगारांना शासन सेवेत सामावून घेण्यासाठी आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय जिल्ह्यातील कोरोना योद्ध्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
संविधान जागर समितीचे संयोजक भारत ससाणे यांच्या अध्यक्षतेखाली अजिंठा शासकीय विश्रागृहात महाराष्ट्र जनक्रांती कोरोना योद्धा संघटनेच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत भारत ससाणे यांनी सांगितले की, इतरांचा जीव वाचावा यासाठी स्वतःचा जीव धोक्यात टाकणारे कोरोना योद्धा खरे शूरवीर आहेत. कोरोना बाधित रुग्णाची सेवा करण्यासाठी कोणीच पुढे यायला तयार नसताना कंत्राटी स्वरूपात का असेना कोविड सेंटर व शासकीय रुग्णालयात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना त्याची सेवा समाप्त करून वाऱ्यावर सोडले जात असेल तर याविरोधात करा किंवा मरा पद्धतीचे आंदोलन करावेच लागेल.
बैठकीला महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे राज्य सचिव हरिश्चंद्र सोनवणे यांनी मार्गदर्शन करतांना पुढील आंदोलनाची रूपरेखा मांडली. यानुसार ऑक्टोंबर महिन्यापासून न्याय मिळेपर्यंत कोरोना योद्ध्यांचे तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे.
प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार यांना कोरोना योद्धांच्या मागण्याचे निवेदन सादर करणे ,जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे, निदर्शने आंदोलन, राज्य हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री,उप मुख्यमंत्री,आरोग्य मंत्री,विरोधी पक्षनेते यांना मागण्याचे निवेदन सादर करणे. कोरोना योद्ध्यांचे कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढणे अशी आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली . बैठकीचे सूत्र संचालन नीलेश बोरा यांनी केले.
या बैठकीला महाराष्ट्र जनकांती मोर्चाचे-वाल्मीक सपकाळे, डॉ. सिद्धार्थ चौधरी, कृष्णा सावळे, सुनिल परदेशी, प्रेमराज वानखेडे ,रामकृष्ण पाटिल, रमेश वानखेडे,सागर चौधरी,प्रशांत कोळी,जयवंत मराठे,अविनाश धनगर, सूरज देशमुख,विनोद चावळे,मनोहर देशमुख,जितेंद्र चौधरी,मयूर नेवे,कुणाल नेवे,राहुल पाटिल, अजय सैंदाणे,रविंद्र पाटील, सोनल बारेला,गंगू बारेला,भाग्यश्री चौधरी,ऐश्वर्या सपकाळे,फरीदा तड़वी,प्रतीक्षा सोनवणे,दीपाली भालेराव यावेळी जळगाव जिल्ह्यातील कोरोना काळात कोविड सेंटर,शासकीय रुग्णालयात कंत्राटी सेवा देणारे आदी कोरोना योद्धा बैठकीत उपस्थित होते.